नवी दिल्ली,दि.१३: सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी राहुल नार्वेकरांवर सुनावणी प्रलंबित ठेवल्यावरून तीव्र शब्दांत ताशेरे ओढले आहेत. आमदार अपात्रतेसंदर्भात विधानसभा अध्यक्षांसमोर सुनावणी प्रलंबित आहे. या प्रक्रियेत मुद्दामहून वेळकाढूपणा केला जात असल्याचे आरोप करत ठाकरे गटाने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. ठाकरे गटाने केलेल्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने चार महिन्यांपूर्वी विधानसभा अध्यक्षांना कार्यवाही करण्याचे निर्देश दिले होते. मात्र, त्यानंतरही कार्यवाही न झाल्यामुळे महिन्याभरापूर्वी पुन्हा एकदा न्यायालयाने विधानसभा अध्यक्षांना सुनावत तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देश दिले. तरीही विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांकडून योग्य ती पावले उचलण्यात न आल्यामुळे न्यायालयासमोर झालेल्या सुनावणीत सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी राहुल नार्वेकरांवर सुनावणी प्रलंबित ठेवल्यावरून तीव्र शब्दांत ताशेरे ओढले आहेत.
विधिज्ञ सिद्धार्थ जाधव यांनी सर्वोच्च न्यायालयात नेमके काय घडले याबाबत माहिती देताना सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड यांना एवढे संतापलेले यापूर्वी पाहिले नव्हते, असे म्हटले आहे. न्यायालयाने सांगितले की, आम्हाला मंगळवारी नवीन वेळापत्रक द्या. हा पोरखेळ सुरु आहे. विधानसभा अध्यक्ष सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाची पायमल्ली करत आहेत, असे सरन्यायाधीशांनी म्हटले आहे. तसेच विधानसभा अध्यक्षांना समजत नसेल तर तुषार मेहता आणि महाराष्ट्राचे महाधिवक्ता यांनी अध्यक्षांबरोबर बसावे व त्यांना समजावून सांगा की सर्वोच्च न्यायालय काय आहे. आमचे आदेश पाळले गेले पाहिजे, अशा कडक शब्दांत न्यायालयाने ठणकावून सांगितले आहे, असे सिद्धार्थ जाधव यांनी सांगितले.
तुमच्यावर २ महिन्यांचा कालावधी लादावा लागेल
विधानसभा अध्यक्षांच्या वतीने वेळापत्रक सादर करण्यात आले. मात्र, यावर सर्वोच्च न्यायालयाचे समाधान झाले नाही. न्यायालयाने ते वेळापत्रक फेटाळले. ठाकरे गटाच्या वकिलांकडून यावर आक्षेप घेण्यात आला. यावरही सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी टिपण्णी केली. मंगळवारी वेळापत्रक बरोबर दिले नाही तर आम्हाला तुमच्यावर २ महिन्यांचा कालावधी लादावा लागेल, असे सरन्यायाधीशांनी सांगितले. तुषार मेहता आणि कपिल सिब्बल यांच्यामध्ये न्यायालयात थोडी वादावादी झाली. परंतु, न्यायाधीशांनी या दोघांना एकत्र कॉफी पिण्याचा सल्ला देत वातावरण सामान्य केले. या सुनावणीत खूपच कडक शब्दात ताशेरे ओढले आहेत. एवढा राग आलेले सरन्यायाधीश यापूर्वी बघितले नाहीत. तुम्ही लवकर निर्णय घ्या, तुम्ही निवडणुकीसाठी थांबले का, असेही सरन्यायाधीश म्हणाल्याचे सिद्धार्थ जाधव यांनी म्हटले आहे.
दरम्यान, न्यायालयाच्या आदेशाची अवहेलना करु नका, असे कुणीतरी विधानसभा अध्यक्षांना सांगा, असे सांगत सरन्यायाधीश यांनी राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना दोन्ही प्रकरणी वेळापत्र देण्यास विधानसभा अध्यक्षांना सांगितले आहे. अजित पवार गटाकडून प्रयत्न होता की हे प्रकरण लांबवावे पण न्यायालयाने त्यांना विचारल की तुम्ही शरद पवार गटावर अत्रातेची कारवाई केली, तुम्हाला का वाटते प्रकरण लांबवावे, असेही ते म्हणाले.