चंद्रकांत पाटील यांनी वादग्रस्त वक्तव्यावर माफी मागावी: दीपक केसरकर

चंद्रकांत पाटील यांनी फुले, आंबेडकर आणि कर्मवीर यांच्यावर वादग्रस्त वक्तव्य केलं होतं

0

मुंबई,दि.10: चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांच्या वादग्रस्त वक्तव्यावर शिंदे गटाचे दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांनी चंद्रकांत पाटील यांनी माफी मागावी असे म्हटले आहे. भाजपाचे नेते मंत्री चंद्रकांत पाटील यांनी फुले, आंबेडकर आणि कर्मवीर यांच्यावर वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. चंद्रकांत पाटील यांच्या वादग्रस्त वक्तव्यानंतर अजित पवारांनी त्यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला.

काय म्हणाले होते चंद्रकांत पाटील?

शाळा सुरू करण्याकरता सरकारच्या अनुदानावर अवलंबून का राहता? असा सवाल करत चंद्रकांत पाटील यांनी वादग्रस्त विधान केलं आहे. ‘महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, कर्मवीर भाऊराव पाटील यांनी शाळा सुरू करण्यासाठी भीक मागितली होती,’ असं वक्तव्य चंद्रकांत पाटील यांनी केलं. यावरून पुन्हा एकदा राजकारण तापल्याचं पहायला मिळत आहे. विरोधकांनी सरकारवर टीकेची झोड उठवली आहे. चंद्रकांत पाटील यांच्या या वक्तव्यावर आता शिंदे गटाकडून देखील प्रतिक्रिया देण्यात आली आहे.

ताबोडतोब माफी मागितली पाहिजे

सरकारला महापुरुषांबद्दल अभिमान असून, महापुरुषांबाबत कुणीही चुकीचं वक्तव्य करू नये. चुकीचं विधान केलं असेल तर ताबोडतोब माफी मागितली पाहिजे. चंद्रकांत पाटील यांच्याशी मी याबाबत बोलणार आहे. ते निश्चितच याबाबत खुलासा करतील, अशी प्रतिक्रिया शिंदे गटाचे प्रवक्ते आणि मंत्री दीपक केसरकर यांनी चंद्रकांत पाटील यांच्या वक्तव्यानंतर दिली आहे.

खोकेवाले कोण आहेत हे जनतेला माहीत आहे

दरम्यान त्यांनी यावेळी पुन्हा एकदा ठाकरे गटावर देखील निशाणा साधला आहे. खोकेवाले कोण आहेत हे जनतेला माहीत आहे. आता खंडणीची धमकी कोणाला येणार नाही. खंडणी घेणाऱ्या लोकांनी महाराष्ट्राला बदनाम केलं आहे. आतापर्यंत सीमाभागात राहणाऱ्या मराठी माणसांना सुविधा मिळत होत्या. मात्र त्या महाविकास आघाडी सरकारच्या काळात बंद झाल्या. बाळासाहेबांच्या विचारापासून ते दूर गेले, असा घणाघात दीपक केसरकर यांनी केला आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here