मुंबई,दि.३: ठाकरे गटाच्या नेत्याने सूचक विधान केले आहे. मागील जवळपास दीड वर्षांपासून महाराष्ट्रात सत्तासंघर्ष सुरू आहे. एकनाथ शिंदे यांच्यासह त्यांच्याबरोबर गेलेल्या १६ आमदारांवर अपात्रतेची टांगती तलवार आहे. १६ आमदारांच्या अपात्रतेवर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यासमोर सुनावणी सुरू आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर कार्यवाहीला वेग आल्याचं दिसत आहे. दरम्यान, ठाकरे गटाचे नेते चंद्रकांत खैरे यांनी महाराष्ट्रात राजकीय भूकंप होईल, असं विधान केलं आहे.
एकनाथ शिंदेंसह १६ आमदार अपात्र ठरतील आणि उद्धव ठाकरे यांच्या बाजुने निकाल लागेल, असं वक्तव्य चंद्रकांत खैरे यांनी केलं. आमची सत्याची बाजू आहे, कोणत्याही परिस्थितीत उद्धव ठाकरेंचाच विजय होईल, असं चंद्रकांत खैरे म्हणाले. ते ‘टीव्ही ९ मराठी’शी बोलत होते.
यावेळी चंद्रकांत खैरे म्हणाले, “१६ आमदारांच्या निकालानंतर महाराष्ट्रात राजकीय भूकंप होणार आहे. आमची सत्याची बाजू आहे. उद्धव ठाकरे एकदम संयमी नेते आहेत. त्यामुळे निश्चितच उद्धव ठाकरेंचा विजय झालाच पाहिजे. त्यांचा विजय होईल, असं मी म्हणत नाही, तर त्यांचा विजय झालाच पाहिजे, असं म्हणतोय. कारण होईल म्हटलं की, तुम्हाला कसं माहीत? असं विचारलं जाईल.”
“मी धार्मिक माणूस आहे. मी माझ्या परमेश्वराकडे प्रार्थना करतो. मी पूजा करतो. त्यामुळे मला माहीत आहे. कोणत्याही परिस्थितीत उद्धव ठाकरेंचाच विजय होईल. या निकालाबाबत जेव्हा आम्ही उच्च न्यायालय, सर्वोच्च न्यायालयातील अनेक न्यायाधीश, सगळ्या तज्ज्ञ मंडळींशी चर्चा करतो, यातून असं निघतं की, हे १६ आमदार अपात्र ठरणार आहेत. ते शंभर टक्के अपात्र होतील. त्यांच्या मित्र पक्षाचे काही लोकही तेच म्हणतायत. हे घडलं तर महाराष्ट्रात खूप मोठा भूकंप होऊ शकतो”, असं सूचक वक्तव्य चंद्रकांत खैरे यांनी केलं.