मुंबई,दि.15: अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने सध्या देशात अवकाळी पावसाची हजेरी पाहायला मिळत आहे. मुंबई, ठाणेसह पालघर जिल्ह्यात तुरळक ठिकाणी हलक्या पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता आहे. गेले काही दिवस या भागात ढगाळ वातावरणासह पावसाची हजेरी पाहायला मिळाली. भारतीय हवामानशास्त्र विभाग (IMD) नुसार, दक्षिणपूर्व बंगाल उपसागरावर कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याची शक्यता आहे. त्यामुळे भारतात 14 नोव्हेंबरपासून पावसाचा नवा टप्पा सुरू होण्याची शक्यता आहे.
दबाव तीव्र होण्याची शक्यता
दरम्यान, 16 नोव्हेंबरच्या सुमारास ते पश्चिम-वायव्य दिशेकडे सरकून मध्य आणि लगतच्या बंगालच्या उपसागरावरील दबाव तीव्र होण्याची शक्यता आहे. गेल्या 24 तासांत तामिळनाडू, केरळ आणि लक्षद्वीपमध्ये काही ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस झाला. बंगालच्या उपसागरातून ईशान्येकडील वारे दक्षिणपूर्व द्वीपकल्पीय भारतावर वाहतात. या हवामानाच्या प्रभावाखाली दक्षिण भारतातील अनेक भागांत पावसाची अपेक्षा आहे.
अवकाळी पावसाचा जोर वाढणार
भारतीय हवामान खात्याच्या अंदाजानुसार या आठवड्यात दक्षिणेकडील राज्यांमध्ये पावसाची शक्यता आहे. हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार, मंगळवारी दक्षिणपूर्व बंगालच्या उपसागरावर कमी दाबाचा पट्टा तयार होण्याची शक्यता वर्तवण्यात आली होती. आयएमडी (IMD) नुसार, कमी दाबाचा पट्टा पश्चिम-वायव्येकडे सरकले जाईल आणि गुरुवारपर्यंत बंगालच्या उपसागरावर दबाव वाढेल. त्यामुळे अवकाळी पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
हवामान विभागाच्या अंदाजानुसार, आग्नेय द्वीपकल्पात 15 नोव्हेंबरपर्यंत जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रात कोकण किनारपट्टीसह गोव्यातही काही ठिकाणी पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. पुढील पाच दिवसांत हवामान आणखी बदलणार आहे.