बीड,दि.5: मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संतोष देशमुख यांना न्याय मिळाला म्हणून मराठा समाज रस्त्यावर उतरला आहे. आक्रोश मोर्चे काढले जात आहेत. अनेक ठिकाणी सर्वपक्षीय मोर्चे काढण्यात येत आहेत. मंत्री धनंजय मुंडेयांच्याविषयी बदनामीकारक वक्तव्य करुन समाजात तेढ निर्माण केल्याचा ठपका मनोज जरांगे पाटील यांच्यावर ठेवण्यात आला आहे.
बदनामीकारक वक्तव्य करुन समाजात तेढ निर्माण केल्याप्रकरणी मनोज जरांगे पाटील यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी आज (दि.5) परळी शहर पोलीस ठाण्यात तुकाराम बाबुराव आघाव यांनी तक्रार दाखल केली आहे. मनोज जरांगेंविरोधात भारतीय न्याय संहिता 2023, सेक्शन 356 (2) प्रमाणे अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस ठाण्यात गेल्यानंतर संतोष देशमुख यांचे भाऊ धनंजय देशमुख यांना धमकी देण्यात आल्याचा प्रकार घडला. याचा उल्लेख करत मनोज जरांगे पाटील यांनी धनंजय मुंडे यांना इशारा दिला आहे. यापुढे जर देशमुख कुटुंबीयांना धक्का लागला, तर धनंजय मुंडेंना रस्त्यावर सुद्धा फिरू देणार नाही, असे मनोज जरांगे म्हणाले.
काय म्हणाले होते मनोज जरांगे पाटील?
धनंजय देशमुख किंवा त्यांच्या कुटुंबीयांना जर धक्का बसला तर घरात घुसून मारू असा शेट इशारा मनोज जरांगे यांनी दिला. मी आतापर्यंत धनंजय मुंडे यांचं नाव घेतलं नाही, देशमुख कुटुंबीयांना जर त्रास झाला तर त्याला रस्त्यावर फिरू देणार नाही असाही इशाराही त्यांनी दिला. संतोष देशमुखांच्या हत्या प्रकरणातील दोषींना शिक्षा व्हावी या मागणीसाठी परभणीत सर्वपक्षीय मोर्चा काढण्यात आला. त्यावेळी मनोज जरांगे यांनी हा इशारा दिला आहे.