भाजपा खासदार अशोक नेते यांच्या गाडीचा भीषण अपघात

0

गडचिरोली,दि.4: भाजपा खासदार अशोक नेते यांच्या गाडीचा मोठा अपघात झाला आहे. नागपूरहून गडचिरोलीकडे जात असताना वीरगाव गावाजवळ हा अपघात झाला आहे. अशोक नेते यांच्या वाहनाला भरधाव टिप्परने धडक दिली. मात्र, ‘सीटबेल्ट’चा वापर केल्याने वेळीच ‘एअरबॅग’ उघडले आणि खासदार नेते, चालक व सुरक्षारक्षक बचावले.

खासदार अशोक नेते हे 3 नोव्हेंबरला मध्यरात्री मुंबईतून नागपूरला पोहोचले. नागपूर येथील शासकीय विश्रामगृहात मुक्काम करून 4 नोव्हेंबरला सकाळी ते गडचिरोलीला जाण्यासाठी निघाले. विहिरीगावजवळ त्यांच्या वाहनासमोर अचानक टिप्पर आले व समोरासमोर जोराची धडक झाली. यावेळी खासदार नेते यांच्यासह चालक, दोन सुरक्षारक्षक व अन्य एक असे पाच जण वाहनात होते.

गाडी गडचिरोलीच्या दिशेला जात असताना समोरुन येणाऱ्या गाडीने त्यांच्या फॉर्ड गाडीला धडक दिली. गाडीच्या उजव्या बाजूला गी धडक बसली. यामध्ये गाडीचं प्रचंड नुकसान झालंय. पण सुदैवाने या अपघातातून अशोक नेते हे थोडक्यात बचावले आहेत. ते सुखरुप असून आता गडचिरोलीला पोहोचल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

खासदार नेते हे समोरील सीटवर होते. त्यांच्यासह चालकाची एअरबॅग उघडली, त्यामुळे त्या दोघांसह आतील इतर तीन प्रवासी सुखरूप बचावले. यानंतर मोठी गर्दी झाली. पोलिसांनी धाव घेत पाहणी केली. नेते हे सहकाऱ्यांसमवेत दुसऱ्या वाहनाने गडचिरोलीत पोहोचले. दरम्यान खासदार नेते यांना विचारणा केली असता त्यांनी सुखरूप असून कार्यकर्त्यांनी काळजी करू नये असे सांगितले.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here