वीजग्राहक सेवेत हयगय झाल्यास थेट कारवाई: संजय ताकसांडे

0

सोलापूर,दि.४: घरगुती असो अथवा कृषी सर्व प्रकारच्या वीजग्राहकांना वेळेत व नियामक आयोगाने ठरवून दिलेल्या मुदतीत प्रत्येक वीज जोडणी देण्यासाठी महावितरण कटिबद्ध असून, वीजग्राहक सेवेत व वीजबिल वसुलीत हयगय करणाऱ्या वीज कर्मचारी व अधिकाऱ्यांना पाठीशी न घालता थेट कारवाई करण्याचे निर्देश महावितरणचे संचालक (संचालन) संजय ताकसांडे यांनी सोलापूर येथील आढावा बैठकीत दिले आहेत.

शुक्रवारी (दि.३) दुपारी सोलापूर शहरातील डीपीडीसी सभागृहात ताकसांडे यांनी सोलापूर जिल्ह्यातील महावितरणच्या विविध कामांचा सविस्तर आढावा घेतला. या बैठकीला प्रादेशिक संचालक अंकुश नाळे, मुख्य अभियंता सुनिल पावडे, प्रभारी अधीक्षक अभियंता मनोज पेठकर यांच्यासह सोलापूर मंडलातील सर्व कार्यकारी अभियंते, उपविभागीय अभियंते व इतर अधिकारी उपस्थित होते.

संचालक संजय ताकसांडे म्हणाले, सोलापूर जिल्ह्यातील अनेक विभाग व उपविभागांनी वसुलीचे उद्दिष्ट गाठलेले नाही. त्यांना चालू महिन्याचे शंभर टक्के व थकबाकीतील 50 टक्के वसुलीचे टार्गेट देण्यात आले आहे. याशिवाय सांघिक कार्यालयाने वेळोवेळी पाठपुरावा करुनही ज्या अधिकाऱ्यांनी नवीन वीजजोडण्या विहित मुदतीत दिलेल्या नाहीत अशा सर्व जोडण्या तातडीने द्याव्यात व त्या ऑनलाईन भराव्यात. यात हयगय करणाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्याचे निर्देश त्यांनी दिले. 31 ते 200 मीटर अंतरातील कृषीपंपाच्या प्रलंबित जोडण्याची 31 ऑगस्ट अखेर दिलेल्या यादीतील कामे नोव्हेंबरअखेर पूर्ण करा.

वीजपुरवठा व बिलींगच्या तक्रारी सुद्धा विहित मुदतीत निकाली काढाव्यात. अचूक रीडिंग अभावी किंवा सरासरी वीजबिलांद्वारे चुकीचे बिल देण्याचे प्रकार खपवून घेतले जाणार नाहीत. सध्या रब्बीचा हंगाम सुरु असून, या काळात रोहित्र जळणार नाहीत यासाठी अतिभारीत वाहिन्यांवर वीजचोरी विरोधात मोहीम राबवून वीजचोरांवर कारवाई करा. तसेच रोहित्र जळाल्यास ते ठराविक काळात बदलण्याची सूचनाही ताकसांडे यांनी केली.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here