जालना,दि.4: अजित पवार गटातील आमदार प्रकाश सोळंके यांनी छत्रपती संभाजीनगर येथील रूग्णालयात मराठा नेते मनोज जरांगे-पाटील यांची भेट घेतली आहे. त्यांनी व्हायरल ऑडिओ क्लिपमधील वक्तव्याबद्दल चूक मान्य केली आहे. बोलण्याच्या ओघात माझ्याकडून चूक झाली होती, असं प्रकाश सोळंके यांनी म्हटलं.
मराठा आरक्षणाच्या मुद्यावरून गेल्या काही दिवसांपूर्वी राज्यात हिंसक वातावरण निर्माण झाले होते. बीड जिल्ह्यात अजित पवार गटाचे आमदार प्रकाश सोळंके यांच्या बंगल्यावर देखील मराठा आंदोलकांनी हल्ला केला होता. यांच्या बंगल्यावर आधी दगडफेक आणि नंतर जाळपोळ करण्यात आली होती. हेच आमदार आता मनोज जरांगे पाटील यांच्या भेटीसाठी दाखल झाले होते. आंदोलनादरम्यान निर्माण झालेले गैरसमजं दूर करण्यासाठी जरांगेंची भेट घेतली असल्याचे त्यांनी म्हटले आहे. यावेळी मनोज जरांगे पाटील आणि प्रकाश सोळंके यांच्यात चर्चा झाल्याचे पाहायला मिळाले. यावेळी सोळंके म्हणाले, ‘प्रत्यक्ष भेट घेऊन मनोज जरांगे यांचा काही गैरसमज झाला असेल तर तो मी दूर करणार आहे, असं मी म्हटलं होतं. मी पहिल्यापासून मराठ्यांना आरक्षण मिळावं म्हणून पुढाकार घेत आहे. मी मराठा असल्याना माझा याला विरोध असण्याचं कारण नाही.’
प्रकाश सोळंके म्हणाले, “मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी मी आंदोलने केली आहेत. मराठा आरक्षणाला विरोध असण्याचं कारण नाही. ‘ऑडिओ क्लिप रेकॉर्ड करू नको,’ असं संबंधित व्यक्तीला सांगितलं होतं. पण, अर्धवट ऑडिओ क्लिप व्हायरल करण्यात आली. बोलण्याच्या ओघात माझ्याकडून चूक झाली होती.”
“माझं आधीपासून एकच मत होतं की, सरकारला पुरेसा वेळ द्यावा. बाकी काही माझी भूमिका नव्हती. घाई गडबडीत निर्णय होऊ नये. कारण, तो निर्णय न्यायालयात टिकणार नाही. हे समोरील व्यक्तीला सांगण्याचा प्रयत्न करत होतो,” असं प्रकाश सोळंकेंनी सांगितलं.
“जाळपोळ करणारे मराठा आंदोलक नव्हते. त्यात राजकीय विरोधक, अवैध काम करणारे आणि अन्य समाजातील होते. ते तपासात समोर येईल,” असं प्रकाश सोळंकेंनी म्हटलं.
यावर जरांगे-पाटील म्हणाले, “जाळपोळीच्या घटनांचं समर्थन करू शकत नाही. आपण शांततेत युद्ध लढत आहोत. हेच आपल्याला न्याय देण्यासाठी पूरक आहे. पण, समाजाचा लढा लढताना द्वेषभावनेतून काम करत नाही. तसेच, प्रकाश सोळंके माझ्याबद्दल असं का? बोलले म्हणून मी त्यांना फोनही केला नाही.”