शिक्षा झालेल्या चौघांना मुंबई उच्च न्यायालयातून जामीन मंजूर

0

सोलापूर,दि.21: ठार मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी शिक्षा झालेल्या चौघांना मुंबई उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. रसूल कणकल राहणार विजापूर रोड, सोलापूर यांच्यासह चौघांवर प्राणघातक हल्ला करून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी 1) बसवराज मंगलमणी 2) सुरेश पांढरे 3) संजय वाघमारे 4) गणेश चित्तळकर सर्व राहणार विजापूर रोड सोलापूर यांना मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती किशोर संत यांनी अपिलात जामीन मंजूर केला.

या हकीकत अशी की दि. 7/1/2014 रोजी यातील फिर्यादी रसूल व त्याचा मित्र इरफान हे दुकानासमोर बोलत थांबले असताना बबलू छप्परबंद व त्याचा भाऊ चांद हे त्यांच्याजवळ आले व बांधकामाचे पाणी बसवराज याच्या अंगावर पडले आहे. त्यामुळे भांडणे झाली आहेत, असे सांगत असताना, वरील सर्व आरोपी हे हातामध्ये शस्त्र घेऊन आले व त्यांनी बबलू व चांद यास मारहाण करण्यास सुरुवात केली.

हेही वाचा Prashant Kishor: निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी सांगितले केंद्रात कोणाची येणार सत्ता

त्यावेळी इरफान शेख व रसूल कणकल हे भांडणे सोडवण्यासाठी मध्ये पडले असता, त्यांनाही वरील चौघांनी तलवार, चैन, फायटर, बॅट याने मारहाण केली, अशा आशयाची फिर्याद रसूल मौलासाब कणकल याने विजापूर नाका पोलीस ठाणे येथे दिली होती.

त्यावरून सदरचा खटला हा जिल्हा व सत्र न्यायालय, सोलापूर येथे चालला असता आरोपींनी जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी त्यांना सात वर्षाच्या कारावासाची शिक्षा ठोठावली होती.

सदर शिक्षेविरुद्ध वरील चारही आरोपीने ॲड. रितेश थोबडे यांचेमार्फत मुंबई उच्च न्यायालयात अपील दाखल केले होते. सदर अपिलात जामीन मिळण्यासाठी अर्ज दाखल केला होता.

अर्जाच्या सुनावणीच्या वेळी ॲड. रितेश थोबडे यांनी आपले युक्तीवादात यातील जखमी साक्षीदार व डॉक्टरांच्या साक्षीतील पुरावा पाहिला असता, सकृतदर्शनी जीवे ठार मारण्याच्या कलमांतर्गत गुन्हा शाबित होत नसल्याचा युक्तिवाद मांडला. त्यावरून न्यायमूर्तींनी आरोपींना 15000/- रुपयाच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला. यात आरोपींतर्फे ॲड.रितेश थोबडे, ॲड. अभिजीत इटकर तर सरकारतर्फे ॲड. ए. आर. पाटील यांनी काम पाहिले.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here