शिंदे गटाच्या रवींद्र वायकर यांच्या विजयाचा संशय बळावला?

0

मुंबई,दि.15: नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत मुंबई उत्तर-पश्चिम लोकसभा मतदारसंघातून शिंदे गटाचे रवींद्र वायकर यांनी ठाकरे गटाचे अमोल कीर्तिकर यांचा पराभव करत विजय संपादन केला. वायकर यांना फेरमतमोजणीत 48 मतांनी विजयी घोषीत करण्यात आले. मतमोजणीच्या दिवशी केंद्रात झालेले गैरप्रकार उजेडात आणण्यासाठी शिवसेनेचे (ठाकरे गट) उमेदवार अमोल कीर्तिकर यांनी सीसीटीव्ही फुटेजची मागणी केली होती, मात्र जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांनी सीसीटीव्ही फुटेज देण्यास नकार दिला. त्यामुळे शिंदे गटाच्या रवींद्र वायकर यांच्या विजयाचा संशय आणखी बळावला आहे.

मतमोजणीच्या सर्वाधिक फेऱ्यांमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे उमेदवार अमोल कीर्तिकर यांना मताधिक्य मिळाले होते, मात्र मधेच काही काळ मतमोजणी केंद्रातील प्रक्रिया थांबवण्यात आली आणि नंतर शिंदे गटाच्या रवींद्र वायकर यांना 48 मतांनी विजयी जाहीर करण्यात आले. या पार्श्वभूमीवर सत्य उजेडात आणण्यासाठी अमोल कीर्तिकर यांनी 11 जूनला निवडणूक आयोगाला पत्र लिहिले होते आणि मतमोजणी केंद्रातील 4 जून रोजीचे संपूर्ण दिवसभरातील सीसीटीव्ही फुटेज देण्याची मागणी केली होती.

रवींद्र वायकर यांच्या विजयाचा संशय बळावला

त्यावर मुंबई उपनगर जिल्ह्याच्या निवडणूक अधिकाऱ्यांनी तीन दिवसांनी उत्तर दिले. त्यात त्यांनी सीसीटीव्ही फुटेज वा व्हिडीओ शूटिंग देणे शक्य नसल्याचे अमोल कीर्तिकर यांना कळवले आहे. हा नकार कळवताना निवडणूक आयोगाची 18 जुलै 2023 ची सूचना आणि निवडणूक नियमावलीमधील तरतुदींकडे बोट दाखवले आहे. जाहीर केलेल्या निकालानुसार दुसऱ्या क्रमांकाची सर्वाधिक मते मिळालेल्या उमेदवाराला मतमोजणीचे सीसीटीव्ही फुटेज का नाकारले, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. एकीकडे रवींद्र वायकर यांचा ‘मॅनेज’ विजय चौकशीच्या कचाटय़ात सापडला आहे. सीसीटीव्ही फुटेज नाकारल्यामुळे मतमोजणीतील घोळाचा संशय बळावला आहे.

मतमोजणी केंद्रात रवींद्र वायकर यांच्या विजयाची मोबाईलवरून सूत्रे हलवली जात होती, असा आरोप करीत अपक्ष उमेदवारांनी पोलिसांत तक्रार केली होती. त्या व्यक्तीविरुद्ध अखेर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. मात्र अपक्ष उमेदवारांच्या तक्रारीऐवजी तहसीलदारांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल केला आहे, तर अपक्ष उमेदवाराला साक्षीदार बनवले आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here