मुंबई,दि.28: मुंबई एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्या समर्थनात भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्चा रस्त्यावर उतरणार आहे. राष्ट्रवादीचे नेते तथा राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी समीर वानखेडे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. समीर वानखेडे यांनी धर्म बदलून नोकरी मिळविल्याचा दावा नवाब मलिक यांनी केला होता. समीर वानखेडे यांनी केलेली कारवाईच बोगस असल्याचा दावा नवाब मलिक यांनी केला होता.
क्रूझ ड्रग पार्टी प्रकरणातील पंच किरण गोसावीच्या बॉडीगार्ड प्रभाकर साईलने ड्रग प्रकरणात आर्यन खानला सोडण्यासाठी 25 कोटींची मागणी करण्यात आल्याचा दावा केला होता. 18 कोटींवर तडजोडी करण्यात आली होती व यातील 8 कोटी रुपये समीर वानखेडे यांना देण्यात येणार होते असाही दावा प्रभाकर साईलने केला होता.
यानंतर राज्य सरकारने एसआयटी मार्फत याची चौकशी सुरू केली आहे. समीर वानखेडे यांच्या समर्थनार्थ भाजपचे उद्या मुंबईत निदर्शनं होणार आहेत. भाजप मुंबई अध्यक्ष मंगलप्रभात लोढा, भाजप ओबीसी मोर्चाचे अध्यक्ष नरेंद्र गावकर यांच्या अध्यक्षतेखाली ही निदर्शनं होणार आहेत. उद्या दुपारी 3 वाजता भाजप प्रदेश कार्यालयाबाहेर समीर वानखेडे समर्थनार्थ भाजपचे आंदोलन होणार आहे.
एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांनी आज मुंबई उच्च न्यायालयात धाव घेऊन अटकेतून अंतरिम दिलासा मिळावा अशी मागणी केली. यानंतर न्यायालयाने त्यांना मोठा दिलासा दिला आहे. हायकोर्टाने महाराष्ट्र सरकारला वानखेडे यांच्यावर सध्या कोणतेही कठोर पाऊल उचलू नये, अटकेच्या 3 दिवस आधी नोटीस द्यावी, असे सांगितले.