Raju Jha Murder: भाजपा नेते राजू झा यांची गोळ्या झाडून हत्या

0

बर्धमान,दि.2: Raju Jha Murder: पश्चिम बंगालमधून मोठी बातमी समोर येत आहे. पूर्व बर्धमान जिल्ह्यात शनिवारी रात्री भारतीय जनता पार्टीचे नेते आणि उद्योजक राजू झा (Raju Jha) यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार राजू झा हे कोलकाताला निघाले होते. त्याचवेळी शक्तिगढ पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या अमरामध्ये एका मिठाईच्या दुकानाबाहेर त्यांच्यावर हल्ला करण्यात आला. जेव्हा गोळीबार झाला तेव्हा राजू हे आपल्या कारमध्ये बसले होते. त्याचवेळी दोन आरोपी कारमधून राजू यांच्या वाहनाजवळ आले, त्यातील एकाने रॉडच्या मदतीनं राजू यांच्या कारच्या काच्या फोडल्या तर दुसऱ्याने त्यांच्यावर अंदाधूंद गोळीबार केला. या घटनेत राजू झा यांचा जागीच मृत्यू झाला. (BJP Leader Killed in West Bengal)

राजू झा यांचा जागीच मृत्यू | Raju Jha Murder

पोलिसांनी पुढे म्हटलं आहे की, आरोपींनी अनेक राऊंड फायर केले. या घटनेत राजू यांचा जागीच मृत्यू झाला. तर त्यांच्यासोबत असलेले अन्य दोघे गंभीर जखमी झाले आहेत. गोळीबारानंतर आरोपी घटनास्थळावरून फरार झाले. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. या हल्ल्यात जखमी झालेल्या व्यक्तींना उपचारासाठी रुग्णालयात हलवण्यात आलं आहे. या प्रकरणात पुढील तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

राजू झा हे हॉटेल व्यवसायिक होते | Raju Jha

समोर आलेल्या माहितीनुसार राजू झा हे हॉटेल व्यवसायिक होते. त्यांनी गेल्या विधानसभा निवडणुकीवेळी भाजपात प्रवेश केला होता. कोळसा तस्करी प्रकरणात त्यांना अटक देखील करण्यात आली होती. घटनेबाबत माहिती देताना बर्धमानचे एसपी कामनासिस सेन यांनी सांगितलं की, राजू झा यांना एकूण पाच गोळ्या लागल्या. या हल्ल्यात त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्यासोबत आणखी दोन व्यक्ती प्रवास करत होते, ते देखील या हल्ल्यात गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. मात्र हल्लेखोरांनी राजू झा यांच्यावर गोळीबार का केला याचं कारण अद्याप समोर आलेलं नाहीये.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here