मराठा समाजाची मोठी रणनिती, लोकसभा निवडणुकीत येणार अडचणी

0

मुंबई,दि.12: मराठा समाजाने मोठी रणनिती तयार केली आहे. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी आक्रमक भूमिका घेत मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळावे यासाठी समाजाच्या बैठका घेत आहेत. राज्य सरकारने दहा टक्के आरक्षण दिले आहे. परंतु मराठा समाजाची ओबीसीतून आरक्षण देण्याची मागणी होत आहे.

आता आगामी लोकसभा निवडणुकीत प्रशासनापुढे अडचणी निर्माण करण्याची तयारी मराठा आंदोलकांनी केली आहे. मराठा समाज आरक्षणाच्या मागणीसाठी आक्रमक झाला आहे. त्यामुळे आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना उमेदवारी जाहीर झालेल्या वाराणसी मतदार संघात अडचणी निर्माण करण्याची कुटनीती तयार केली आहे. त्यासाठी वाराणसी येथून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात 1 हजार उमेदवारी अर्ज भरण्याचा इशारा दिला आहे.

हजारापेक्षा जास्त उमेदवार असल्यास ईव्हीएमवर मतदान घेता येत नाही. त्यामुळे मराठा समाजाने हा निर्णय घेतला आहे. परभणी शहरातील भाग्यलक्ष्मी मंगल कार्यालयात (5 मार्चला) परभणीतील मराठा समाजाची बैठक घेण्यात आली होती. या बैठकीला विविध संघटनाचे पदाधिकारी, मराठा बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी जिल्ह्यातून एक हजार मराठा उमेदवार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाराणसी मतदार संघातून उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. सकल मराठा समाजाकडून आंदोलनाची पुढची दिशा ठरवण्यासाठी परभणीत आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत हा ठराव मंजूर करण्यात आला होता. वाराणसी पाठोपाठ राहुल गांधी, बारामती आणि ठाणे या चार मतदार संघात मराठा समाज बांधव उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. येणाऱ्या दिवसात राजकारणासाठी गाव बंदी पाठोपाठ घर बंदी करण्याचा ठराव ही मंजूर करण्यात आला आहे. 

मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांची सगेसोयरे दाखल्यांची अंमलबजावणी झाला नाही तर प्रत्येक मतदारसंघात 2 हजार उमेदवार देणार, असा इशारा मराठा समाजाने दिला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदीच नाही तर राहुल गांधी, सुप्रिया सुळे यांच्या मतदारसंघात देखील मराठा समाज उमेदवार देणार आहे.  

मराठवाडा व महाराष्ट्रातून वाराणसीत लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्यात येणार असल्याचे मराठा आरक्षणाचे आंदोलक विनायक पाटील यांनी म्हटले आहे. त्यासाठी वाराणसीत आत्मक्लेश आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे. आत्महत्या केलेल्या मराठा तरुणांच्या अस्थी गंगा नदीत विसर्जित करुन करणार आत्मक्लेश करण्यात येणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. मराठवाड्यातील हैद्राबाद गॅझेट स्वीकारून सरसकट कुणबी मराठा आरक्षण देण्याची मागणी विनायक पाटील यांनी केली आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here