आयकर विभागाची सोलापूरसह या जिल्ह्यात मोठी कारवाई

0

दि.9: आयकर विभागाने सोलापूर, उस्मानाबाद, कोल्हापूर आणि नाशिक या जिल्ह्यात मोठी कारवाई केली आहे. कर चोरांविरुद्ध आयकर खात्याने जोरदार मोहीम सुरू केली आहे. यामुळे वाळू माफिया आणि साखर सम्राटांना मोठा दणका बसला आहे. महाराष्ट्रातील 4 जिल्ह्यात तब्बल 20 जागी आयकर विभागाने छापे टाकले. यात 25 ऑगस्ट रोजी सर्च ऑपरेशनच्या माध्यमातून केलेल्या कारवाईतून आयकर विभागाच्या हाती मोठं घबाड लागलं आहे.

मोठी कारवाई

आयकर विभागाने केलेल्या कारवाईत तब्बल 50 कोटींपेक्षा जास्त बेहिशेबी उत्पन्न आणि100 कोटींपेक्षा जास्त बेनामी व्यवहार उघड झाला आहे. तसेच आयकर विभागाने 5 कोटींचा मुद्देमालही जप्त केला. सोलापूर, उस्मानाबाद, कोल्हापूर आणि नाशिक या जिल्ह्यात आयकर विभागाने सर्च ऑपरेशन केलं होतं. यावेळी आयकर विभागाने हार्ड डिस्क, कागदपत्रे जप्त केली आहेत.

दोन आठवड्यापूर्वी पंढरपूरचे साखर कारखानदार (Pandharpur News) अभिजीत पाटील (Abhijeet Patil) आणि सोलापूरच्या अश्विनी हॅस्पीटलचे प्रमुख बिपीन पटेल यांच्या मालमत्तेवर आयकर विभागाचे छापे पडले होते. त्या छाप्यात 100 कोटीहून अधिक रक्कमेची बेहिशोबी मालमत्ता सापडली आहे. 43 कोटी जप्त करण्यात आले आहेत.

प्राप्तिकर विभागाने 25 ऑगस्टला वाळू उत्खनन, साखर उत्पादन, रस्ते बांधकाम, आरोग्यसेवा, वैद्यकीय महाविद्यालय चालवणे इत्यादी व्यवसायात गुंतलेल्या अभिजीत पाटील आणि बिपीन पटेल यांच्याशी निगडीत ठिकाणी शोध आणि जप्तीची कारवाई केली. या शोध मोहिमेत 20 हून अधिक ठिकाणी हे छापे पडले.  महाराष्ट्रातील सोलापूर, उस्मानाबाद, नाशिक आणि कोल्हापूर जिल्ह्यात ही कारवाई झाली.

वैद्यकीय व्यावसायीकांकडे काय सापडले?
आरोग्य सेवा आणि वैद्यकीय महाविद्यालय चालवण्याच्या व्यवसायात गुंतलेल्या दुसऱ्या गटाकडे काही बाबी आढळून आल्यात. रस्ते बांधकाम, कॅपिटेशन फी आणि डॉक्टर, पीजी विद्यार्थ्यांना दिलेला पगार आणि स्टायपेंड यांचा परतावा दर्शविणाऱ्या बोगस रोख पावत्यांचे पुरावे आढळले आहेत. या शिवाय बोगस खर्चाचे बुकिंग आणि कंत्राटी पद्धतीने 35 कोटींची देयके पुरावे सापडले आहेत आणि जप्त करण्यात आले आहेत. या गटाचे अघोषित 35 कोटी जप्त करण्यात आले आहेत.

हेही वाचा Solapur IT Raids: सोलापुरात आयकर विभागाच्या धाडी, प्रसिद्ध हॉस्पिटल्स, कारखाने आणि उद्योगांची तपासणी

उत्पादन, रस्ते, बांधकाम, आरोग्यसेवा, वैद्यकीय महाविद्यालय यासह वाळू उत्खनन, साखर उत्पादन यात गुंतवणूक असलेल्या 2 बड्या समूहांना दणका बसला आहे. यावेळी झालेल्या कारवाईत करचोरीच्या अनेक पद्धती उघड झाल्या आहेत. तसेच करोडोंची बेहिशोबी रोख रक्कम जप्त करण्यात आली.

वैद्यकीय क्षेत्रातील आर्थिक अनागोंदीवरही आयकर खात्याची कुऱ्हाड टाकली. कर चोरांविरुद्ध आयकर खात्याने जोरदार मोहीम सुरू केली आहे. तर येत्या दिवसात, ही कारवाई अधिक आक्रमक पद्धतीने होणार आहे. यात अनेक बडे डॉक्टर्स, व्यावसायिक आयकर खात्याच्या रडारवर असल्याची माहिती मिळाली आहे.

आतापर्यंत या शोध मोहिमेत 50 कोटींहून अधिकचे बेहिशेबी उत्पन्न सापडले आहे. 100 कोटी पुढे अघोषित मालमत्ता सापडली आहे. 5 कोटींचा मुद्देमालही जप्त करण्यात आला आहे. पुढील तपास सुरू आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here