आमदार भास्कर जाधव यांचे नारायण राणे यांच्यावर गंभीर आरोप

0

सिंधुदुर्ग,दि.१८: शिवसेनेचे (ठाकरे गट) आमदार भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) यांनी नारायण राणे (Narayan Rane) यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. भास्कर जाधव यांनी बोचऱ्या शब्दात नारायण राणे यांच्यावर टीका केली आहे. शिवसेना आमदार वैभव नाईक यांच्या समर्थनार्थ आज कुडाळमध्ये एका विराट मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं. या मोर्चानंतर उपस्थित कार्यकर्त्यांना संबोधित करताना उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार भास्कर जाधव यांनी राणे पितापुत्रांवर घणाघाती टीका केली. तसेच त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप केले. राणेंना गेल्या आठ वर्षांत कुणी सभेसाठी बोलावलेलं नाही. नेते देशाचे आणि गल्लीतलं कुत्रही विचारत नाही, असा टोलाही त्यांनी लगावला.

भास्कर जाधव म्हणाले की, सिंधुदुर्गातील कोंबडीवाले, बेडूक यांनी रे रोडला एक प्रोजेक्ट उभा केला. या प्रोजेक्टमध्ये ३०० कोटी रुपयांचा भ्रष्टाचार केला. त्यांच्याविरोधात ईडीची कारवाई सुरू करावी म्हणून याच भाजपामधील किरीट सोमय्या यांनी मागणी केली होती. आज मंत्रिमंडळात बसलेले ५०-५५ टक्के लोक, आमदार यांच्यावर भाजपाने गंभीर आरोप केले होते. तेच लोक भाजपामध्ये गेल्यावर अगदी साफ स्वच्छ होतात. निरमा पावडरचा कारखानाच भाजपाच्या घरात सुरू झाला आहे, असा टोला भास्कर जाधव यांनी लगावला.

या कोंबडीवाल्यांनी साडे अठरा वर्षांपूर्वी यांनी शिवसेना सोडली. उद्धव ठाकरे यांच्यावर बोलतच नाही. मात्र नारायण राणे हे गेली १८ वर्षे एकच वाक्य बोलताहेत की मी शिवसेना सोडली आणि शिवसेना संपली. उद्धव ठाकरेंचं मुख्यमंत्रिपद गेलं आणि शिवसेना संपली, बरं मीसुद्धा शिवसेना सोडली होती. पण टीका करण्याची एक मर्यादा असते, असे भास्कर जाधव म्हणाले.

या राणेंना गेल्या आठ वर्षांत कुणी सभेसाठी बोलावलेलं नाही. नेते देशाचे आणि गल्लीतलं कुत्रही विचारत नाही. नुसती उद्धव ठाकरेंची सभा झाली की मीडियासमोर येऊन बोलतात. मी ३९ वर्षे शिवसेनेत काम केलं. मग ३९ वर्षे काय दाढ्या करत होतात काय. आज बाळासाहेब असते तर त्यांनी राणेंना विचारले असते की, त्यावेळी अंधेरी-गोरेगावला म्हशीचे तबेले होते. शिवसेनेने काहीच केलं नाही, मग मुख्यमंत्रीपदापर्यंत गेलेल्या तुम्ही काय म्हशी भादरत होतात का? अशी बोचरी टीका भास्कर जाधव यांनी नारायण राणेंवर केली.

यावेळी जाधव यांनी भाजपाच्या वरिष्ठ नेतृत्वाच्या प्रादेशिक पक्षांबाबतच्या भूमिकेवरही टीका केली. ते म्हणाले की, आज स्वातंत्र्याला ७५ वर्षे झाली आहे. या ७५ वर्षात कुठल्याही राज्यकर्त्याने विरोधी पक्षाचा छळवाद मांडला नव्हता. तो भाजपाने मांडलाय. भाजपाचे अध्यक्ष म्हणतात की, छोटे पक्ष शिल्लकच ठेवायचे नाही. राहील तो भाजपाच. या देशाचे गृहमंत्री महाराष्ट्रात येऊन शिवसेनेला जमीन दाखवू, असे म्हणतात, असा आरोप त्यांनी केला.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here