सोलापूर,दि.२५: महापौर कार्यालयात मारहाण प्रकरण सुहास कदमसह पाचजणांना न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. सन २०१७ मध्ये महापौरांच्या खुर्चीला गाजराचा हार घालून सरकारी कर्मचाऱ्यास मारहाण करून सरकारी कामात अडथळा केल्याप्रकरणी युवा कार्यकर्ते राष्ट्रवादी विद्यार्थी आघाडीचे १) सुहास विजय कदम, डेमोक्रेटिक पार्टीचे जिल्हाध्यक्ष २) सोहन प्रमोद लोंढे, मराठा क्रांतीचे समन्वयक ३) राम अनिल जाधव, सामाजिक कार्यकर्ते ४) राज यशवंत सलगर, ५) अतिश मोहन बनसोडे सर्व रा.सोलापूर यांचा जामीन अर्ज अतिरिक्त सत्र न्यायाधीश शेख यांनी मंजूर करून त्यांना प्रत्येकी २५०००/- च्या जामिनावर मुक्त करणेचा आदेश दिला.
महापौर कार्यालयात मारहाण प्रकरण
यात हकिकत अशी की, दि.२१/६/२०१७ रोजी दुपारी १२.३० ते १.००च्या दरम्यान महापौर कक्षामध्ये,कक्षासमोर तसेच सभागृह नेत्यांच्या कक्षासमोर व स्थायी समिती सभापतीचे कक्षासमोर १) सुहास विजय कदम २) सोहन प्रमोद लोंढे ३) राम अनिल जाधव ४) राज यशवंत सलगर ५) सागर शितोळे ६) आतिश मोहन बनसोडे यांनी एकत्रित येऊन महापौर कक्षाचे शिपाईस आम्हाला महापौरांना निवेदन द्यावयाचे आहे आत सोडा असे म्हणू लागले. त्यावेळी शिपाईने आरोपींना मॅडम ह्या कार्यक्रमासाठी बाहेर गेले आहेत तुम्ही नंतर या असे समजावून सांगत असताना आरोपी हे जोर जोरात विकास कामाला प्राधान्य द्या, बजेट आधी मांडा नाही तर खुर्च्या खाली करा असे घोषणा देऊ लागले व त्यावेळी शिपाईस धक्काबुक्की करून त्याला ढकलून देऊन महापौर कक्षात गेले.
त्यावेळी महापौरांचे स्वीय सहाय्यक रमेश यशवंत जोशी यांनी मॅडम सध्या नाहीत तुमचे निवेदन माझ्याकडे द्या असे समजावून सांगत होता. परंतु आरोपींनी शिपायास मारहाण करून महापौरांच्या खुर्चीला व सभागृह नेत्यांच्या नामफलकास गाजराचा हार घालून घोषणा देऊन सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी फिर्यादीने आरोपींविरूध्द सदर बझार पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती.
यात आरोपीनी जामीन मिळण्यासाठी केलेला अटकपूर्व जामीन अर्ज मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळल्यानंतर ॲड. संतोष न्हावकर यांच्यामार्फत सोलापूर सत्र न्यायालयात न्यायालयाचे स्वाधीन होऊन जामीन अर्ज दाखल केला होता.
यात आरोपीतफे ॲड. संतोष न्हावकर यांनी युक्तिवाद करताना आरोपीनी फक्त सामाजिक प्रश्नांवर आंदोलन केल्याचे व मारहाण केल्याची बाब वाढवून दाखवल्याचे न्यायालयचे निदर्शनास आणून दिले सदरचा युक्तिवाद ग्राह्य मानुन न्यायमूर्तींनी सर्वांना जामीनावर मुक्त करणेचा आदेश दिला.
यात आरोपींतफे ॲड. संतोष न्हावकर, ॲड. वैष्णवी न्हावकर, ॲड. राहुल रूपनर यांनी तर सरकार पक्षातर्फे ॲड. गंगाधर रामपूरे यांनी काम पाहिले.