Babandada Shinde: आमदार बबनदादा शिंदे यांनी घेतला मोठा निर्णय

0

सोलापूर,दि.5: राष्ट्रवादीचे (अजित पवार गट) आमदार बबनदादा शिंदे (Babandada Shinde) यांनी मोठा निर्णय घेतला आहे. बबनदादा शिंदे हे राष्ट्रवादी (अजित पवार गट) सहभागी झाले होते. मात्र अलिकडच्या काळात ते राष्ट्रवादीच्या (शरद पवार गट) संपर्कात होते. यावेळी बबनदादा यांनी विधानसभा निवडणूक न लढवता त्यांचे पुत्र रणजीतसिंह शिंदे यांना निवडणुकीत उभा करण्याचा निर्णय घेतला आहे.

माढा विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी मिळावी, अशी मागणी आपण दोनवेळा शरद पवार (Sharad Pawar) यांच्याकडे केली असून त्यांनी उमेदवारी दिली तर ठीक नाहीतर रणजीतसिंह शिंदे हे अपक्ष निवडणूक लढवतील, असे स्पष्ट मत आमदार बबनदादा शिंदे यांनी व्यक्त केले. पंढरपूर तालुक्यातील शेगाव दुमाला येथे आमदार शिंदे आले असता त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. 

ते म्हणाले मी दोनवेळा खासदार शरद पवार यांची भेट घेतली आहे. त्यांच्यासोबत मी 38 वर्ष राहिलो असून मागील दोन वर्षेच त्यांच्या पक्षापासून दूर गेलो होतो. आम्ही आमचे कार्यकर्ते, पदाधिकारी यांच्याशी बैठक घेऊन चर्चा केली असता सर्वांचा सूर हा शरद पवार यांच्या पक्षाकडूनच उमेदवारी घ्यावी, असा होता. म्हणून पवारांना जाऊन दोनवेळा भेटलो. त्यांच्याकडे रणजीतसिंह शिंदे यांच्याकरता उमेदवारी मागितली आहे, असे आमदार शिंदे म्हणाले.

माढा विधानसभा मतदारसंघातून मोहिते पाटील निवडणूक लढवण्याची शक्यता असल्याच्या प्रश्नावर बोलताना आमदार बबनदादा शिंदे म्हणाले, याबाबत कोणतेही आव्हान वाटत नाही, निवडणुकीमध्ये प्रत्येकाला उभारण्याचा अधिकार आहे. माढा विधानसभा मतदारसंघात ऊसदराचा प्रश्न तापवण्याचा प्रयत्न काही नेत्यांकडून केला जात आहे. यावर बोलताना शिंदे म्हणाले की, हा सगळा निवडणुकीपुरता जुमला आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here