सोलापूर,दि.२: दक्षिण सोलापूर तालुक्यातील कुंभारी येथे किरकोळ कारणावरून एका गटाने दुसऱ्या गटावर दगडफेक केल्याप्रकरणी १४ जणांविरुध्द अॅट्रॉसिटी, पोक्सोसह विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना बुधवारी सायंकाळी साडेसातच्या सुमारास घडली.
याप्रकरणी एका महिलेने दिलेल्या फिर्यादीवरुन आप्पासाहेब बिराजदार, रोहित बिराजदार, सागर तेली, शिवानंद आंदोडगी, जी. जी. पाटील, कल्लू छपेकर, संतोष कुदरे, नागेश कुदरे, श्रीशैल माळी, आप्पा छपेकर, चन्नप्पा छपेकर, लिंगराज खाडे, चंदू रेड्डी, रामा आंदोडगी (सर्व रा. कुंभारी) यांच्याविरुध्द वळसंग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बुधवारी (दि.३१) सायंकाळी साडेसातच्या सुमारास कुंभारीतील पारधी कॅम्प येथे किरकोळ कारणावरुन आरोपी घरामध्ये घुसून छेडछाड करीत असताना अडविले असता दगड घेऊन मारल्याने डोळ्याखाली जखम झाली आहे. तसेच यावेळी सर्वजण तुला खूप मस्ती आली का असे म्हणून जातीवाचक शिवीगाळ केली. त्यावेळी फिर्यादीनेही त्यांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली असता त्यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली.
त्याचवेळी एक महिला भांडण सोडविण्याकरता आली असता आरोपीने सात ग्रॅमचे सोन्याचे गंठण तोडून घेतले. त्यावेळी आरडाओरड केली असता समाजातील काही महिला मदतीसाठी आल्या. तेव्हा आरोपींपैकी एकाने गावातील मुलांना मोबाइल करून पारधी कॅम्पमध्ये या, आम्हाला महिला व पुरुष दमदाटी करीत असल्याचे सांगितले.
पाच ते दहा मिनिटातच पारधी कॅम्पमध्ये इतर काही लोक काठ्या, लोखंडी पाईप, रॉड घेऊन आले व त्यांनी दगडफेक केली. रिक्षा, मोटारसायकल, चारचाकी वाहने, लक्ष्मी मंदिरमधील साऊंड सिस्टिम, दिवे, तीस ते चाळीस घरांच्या काचा, खिडक्या, दारे यांचे नुकसान केले. याबाबत वळसंग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास उपविभागीय पोलीस अधिकारी विलास यामावर हे करत आहेत.