नवी दिल्ली,दि.1: Arvind Kejriwal On Politics: दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जोरदार टीका केली आहे. अबकारी धोरण घोटाळ्यात दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्या अटकेनंतर राजकारण तापले आहे. बुधवारी प्रसारमाध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केंद्रावर जोरदार टीका केली. ‘मी अनेक लोकांशी बोललो, लोकांमध्ये प्रचंड संताप आहे. भाजपचे लोक काय करतात, तर वाटेल त्याला पकडून तुरुंगात टाकतात. त्यांनी आमच्या दोन चांगल्या मंत्र्यांना अटक केली. या दोन्ही मंत्र्यांनी संपूर्ण जगात देशाचे नाव उंचावले,’ अशी प्रतिक्रिया केजरीवाल यांनी दिली.
केजरीवाल म्हणाले, ‘मनीष सिसोदिया यांनी सरकारी शाळेला नवसंजीवनी दिली आणि संपूर्ण जगाला शिक्षणाचा आदर्श दिला. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांच्या पत्नी त्यांची शाळा पाहण्यासाठी आल्या. दारू धोरण हे फक्त कारण आहे. पंतप्रधानांना दिल्लीत सुरू असलेली चांगली कामे थांबवायची आहेत. मध्य प्रदेश, गुजरात आणि इतर अनेक ठिकाणी त्यांचे सरकार आहे, पण इतक्या वर्षातही शाळा किंवा हॉस्पिटल ठीक करू शकले नाही. मग आता काय करायचे, तर आम आदमी पार्टीला चांगली कामं करू द्यायची नाहीत. स्वतःला जे करता येत नाही, दुसऱ्यांनाही करू द्यायचे नाही,’ अशी टीकाही त्यांनी केली.
‘मनीष सिसोदिया यांनी शिक्षणात चांगले काम केले नसते तर त्यांना अटक झाली नसती. सत्येंद्र जैन यांनी आरोग्य क्षेत्रात चांगले काम केले नसते तर त्यांना अटक झाली नसती. काम थांबवणे हाच उद्देश होता. मनीष सिसोदिया आज भाजपमध्ये दाखल झाले तर उद्या त्यांची सुटका होईल. सत्येंद्र जैन यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यास सर्व खटले संपतील आणि ते तुरुंगातून बाहेर येतील. आज मी दिल्लीतील जनतेला आश्वासन देऊ इच्छितो की काम थांबणार नाही. आधी 80 स्पीडने चालत होते, आता 150 च्या स्पीडने धावणार आहे,’ असंही ते म्हणाले.