बीड,दि.28: बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी आरोपींवर कडक कारवाई करण्यात यावी यासाठी आज बीडमध्ये मूक मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी या प्रकरणातील आरोपींबाबत मोठा दावा केला आहे. या प्रकरणातील तीन आरोपींचा मर्डर करण्यात आल्याचा फोन आपल्याला आल्याचा दावाही अंजली दमानियांनी केला आहे.
अंजली दमानिया यांनी आपण मोर्चात सहभागी होणार नसून ठिय्या आंदोलन करुन संतोष देशमुखांना न्याय मिळवून देणार असल्याचं ‘झी 24 तास’शी बोलताना सांगितलं. बीडमधील सर्वपक्षीय मोर्चाबद्दल बोलताना दमानिया यांनी, “सध्या तिथे राजकीय ड्रामा सुरु झालेला आहे. संदीप क्षीरसागर, सुरेश धस हे दुसरे धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराडच आहेत. ते आपआपल्या क्षेत्रात तिचं काम करतात. अशा लोकांनी बोलावं हे हस्यास्पद आहे. आम्ही हातभर चांगली माणसं जोपर्यंत धनंजय मुंडेंचा राजीनामा स्वीकारत नाही आणि वाल्मिक कराडला अटक केली जात नाही तोपर्यंत आम्ही ठिय्या आंदोलन करणार आहोत,” असं सांगितलं.
दमानिया यांनी सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येतील पोलिसांनी पकडले नसलेल्या तीन आरोपींबाबत मोठा दावा केला आहे. या प्रकरणात पकडले जात नसलेल्या 3 आरोपींचा खून झाल्याचा गंभीर आरोप अंजली दमानियांनी केला आहे. याबाबत मला फोन आल्याचा दावा त्यांनी केला. ही माहिती आपण पोलिसांना दिल्याचे दमानिया यांनी सांगितले. धनंजय मुंडे यांच्या मंत्रिपदाचा राजिनामा अजूनही का घेत नाहीत? असा सवालही दमानिया यांनी केला. तसेच वाल्मिक कराड याला अटक करण्याची मागणीही त्यांनी केला.