सोलापूर,दि.25: Amrit Snan Solapur: प्रयागराजला महाकुंभ मेळ्यात स्नान करण्यासाठी भाविकांची गर्दी वाढत असताना ज्या भाविकांना प्रयागराजला जाता आले नाही त्यांच्यासाठी सोलापुरात अमृत स्नानाचे आयोजन करण्यात आले आहे. श्री सिद्धेश्वर तलावानजीक गणपती घाटावर बुधवार दि. 26 फेब्रुवारी रोजी महाशिवरात्रीला अमृत स्नान कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. जय संतोषी माता गोशाळा सोलापूर यांच्या पुढाकाराने हा कार्यक्रम होत आहे, अशी माहिती गोशाळेचे अध्यक्ष डॉ. राजेंद्र गाजुल यांनी पत्रकार परिषदेत दिली.
विश्व हिंदू परिषदेचे ह.भ.प अभिमन्यू डोंगरे महाराज तसेच डॉ. राजेंद्र गाजुल यांनी प्रयागराज येथे जाऊन गंगाजल आणले आहे. हे गंगाजल सोलापुरात ज्या भाविकांना प्रयागराज येथे जाता आले नाही त्यांच्यासाठी अमृत स्नानासाठी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. यासाठी गणपती घाटावर विशेष सुविधा करण्यात आली आहे.एका हौदामध्ये तसेच पाण्याच्या टँकरमध्ये हे गंगाजल टाकण्यात येईल. येथे भाविकांना स्नान करता येईल. त्याआधी या गंगाजलाची विधिवत पूजा पुरोहितांच्या हस्ते करण्यात येईल. पहाटे पाच वाजल्यापासून हा मुहूर्त आहे.
मुहूर्त | Amrut Snan
स्नान करण्याचा मुहूर्त पहाटे 5.09 ते 5.59 पर्यंत आहे. गंगाजल हे स्वच्छ टँकरच्या नळाद्वारे गोमुखातून पाणी सोडले जाणार आहे. हे गंगाजल घरी घेऊन जाता येईल अशी सोय करण्यात आली आहे. प्रारंभी संत, महंत गुरु व महाराज हे गंगापूजन करून स्नान करतील . त्यानंतर सोलापुरातील भाविक भक्तांना साधुसंतांचा महा कुंभ अमृत स्नान सोहळा अनुभवता येणार आहे. पर्व काळात सकाळी 6.19 ते सायंकाळी 6.26 पर्यंत आहे. त्यानंतर महा कुंभ अमृत स्नान होईल. संध्याकाळी 7.30 वाजता महागंगा आरती होणार आहे.
याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून हभप गहिनीनाथ औसेकर महाराज, हभप सुधाकर इंगळे महाराज, हभप अभिमन्यू डोंगरे महाराज, हभप श्री लक्ष्मण महाराज चव्हाण, रमेश सिंगजी महाराज, मातोश्री पुष्पलता भोसले आदी उपस्थित राहणार आहेत.
येथेही व्यवस्था |Amrut Snan Solapur
स्त्री आणि पुरुषांसाठी वेगवेगळी व्यवस्था करण्यात आली आहे. यासाठी मंडप आणि स्टेज उभारण्यात येत आहे.अशीच सुविधा सोलापुरात इंचगिरी मठ आणि दमानी नगर येथेही करण्यात येणार आहे. या वेळेत सोलापूरकरांनी या अमृत स्नानाचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.