Ajit Pawar: राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांच्या विधानावर अजित पवार म्हणाले…

0

मुंबई,दि.२८: Ajit Pawar On Sharad Pawar’s Statement: राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांच्या विधानावर अजित पवारांनी प्रतिक्रिया दिली आहे. शरद पवार यांनी “आता भाकरी फिरवण्याची वेळ आली आहे”, असं सूचक वक्तव्य केलं. यानंतर राज्याच्या राजकारणात चर्चांना उधाण आलं आहे. शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट यांनी तर भाकरी फिरवणे म्हणजे अजित पवारांना दूर केलं पाहिजे, असं अर्थ होत असल्याचा दावा केला. या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षनेते व राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अजित पवार यांना पत्रकारांनी प्रश्न विचारला. त्यावर अजित पवारांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली. ते गुरुवारी (२७ एप्रिल) पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर बोलत होते.

गेल्या ५५-६० वर्षांच्या राजकीय जीवनात काही प्रसंग | Ajit Pawar On Sharad Pawar’s Statement

शरद पवार यांनी आता भाकरी फिरवण्याची वेळ आली आहे, असं विधान केलं. हे काही बदलाचे संकेत आहेत का? अशी विचारणा केल्यावर अजित पवार म्हणाले, “शरद पवारांनी गेल्या ५५-६० वर्षांच्या राजकीय जीवनात काही प्रसंग लक्षात घेऊन अनेकदा भाकरी फिरवण्याचं काम केलं आहे. त्यामुळे नवे लोक पुढे आले आहेत, हे सर्वांनी पाहिलं आहे.”

आम्ही चाळीशीत असताना शरद पवारांनी | Ajit Pawar

“आम्ही चाळीशीत असताना शरद पवारांनी मला, आर. आर. पाटील, जयंत पाटील, दिलीप वळसे पाटील, सुनील तटकरे अशा अनेकांना संधी दिली. त्यामुळे आम्ही महाराष्ट्रात आम्ही आमचं काम दाखवू शकलो. जसं सगळ्यांना वाटतं की मला प्रमोशन मिळावं तसं नव्या कार्यकर्त्यांनाही वाटतं. माझीही तीच इच्छा आहे की, आमदारकी-खासदारकीत काही नवे चेहरे आले पाहिजे,” असं अजित पवारांनी नमूद केलं.

राज ठाकरेंनी अजित पवारांना सल्ला देताना बाहेर लक्ष देता तसं काकांकडेही लक्ष द्या, असं म्हटलं. यावर अजित पवारांनीही टोलेबाजी केली. अजित पवार म्हणाले, “ठीक आहे, राज ठाकरेंनी जसं त्यांच्या काकांकडे लक्ष ठेवलं, तसं मीही माझ्या काकांकडे लक्ष ठेवेन.”


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here