मुंबई,दि.२४: अजित पवारांनी बंड केल्यामुळे राष्ट्रवादीत फुट पडली. अजित पवारांनी राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्हावर दावा केला आहे. नुकतीच राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी शरद पवार यांच्याबरोबरचा फोटो शेअर केला होता. त्यानंतर चर्चांना उधाण आले. नव्या संसदेत सुरू झालेल्या अधिवेशनात अजित पवार गटाचे नेते प्रफुल्ल पटेल आणि शरद पवार एकत्र आलेले दिसले. त्यांचा एक फोटो व्हायरल झाला आणि त्यावरून राजकीय चर्चांना उधाण आलं. आता याबाबत अजित पवारांना पुण्यात विचारलं असता त्यांनी रविवारी (२४ सप्टेंबर) प्रतिक्रिया दिली.
शरद पवार आणि प्रफुल्ल पटेलांचा एकत्र फोटो
अजित पवार म्हणाले, “मला शरद पवार आणि प्रफुल्ल पटेलांचा फोटोवर काहीही बोलायचं नाही. माध्यमं याचा फोटो आणि त्याचा फोटो असं विचारता. माझं ते काम नाही. तुम्ही विकासाबद्दल मला विचारा.”
माझं काम त्या पद्धतीने सुरू आहे…
“मी सातत्याने महाराष्ट्रात फिरत असताना विकास करण्यासाठी, प्रश्न सोडवण्यासाठी मी आणि माझ्या सहकाऱ्यांनी एक भूमिका घेतली आहे. माझं काम त्या पद्धतीने सुरू आहे. मी माझ्या ज्या बैठका घेतो आहे, आढावा घेतो आहे त्यात महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या प्रश्नांना गती देतो आहे,” असं मत अजित पवारांनी व्यक्त केलं.
“त्यासाठी १५ दिवसांनी, तीन आठवड्यांनी बैठका घेत असतो. ती कामं कशामुळे थांबली आहेत, का पुढे जात नाहीत, काय अडचणी आहेत हे सोडवतो. याचा आढावा घेतला की आपोआप त्या कामाला गती मिळते,” असंही अजित पवारांनी नमूद केलं.