मुंबई,दि.7: अभिनेते किरण माने यांनी शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केला आहे. किरण माने यांनी अनेक मालिका आणि नाटकांत काम केले आहे. किरण माने सोशल मिडियावर अनेकदा केलेल्या पोस्टमुळे चर्चेत असतात. किरण माने राजकारणात प्रवेश करणार असल्याची चर्चा अनेक दिवसापासून सुरू होती. अखेर आज माने यांनी राजकारणात पदार्पण केले.
किरण माने यांनी उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत ठाकरे गटात प्रवेश केला. यावेळी माने म्हणाले, “शिवसेना सामान्य माणसाला कुठून कुठे नेऊन ठेवते, हे खरंच आहे. मी एक सामान्य घरातील माणूस, एक कलाकार आहे. अनेकांना माझ्या या भूमिकेचं आश्चर्य वाटलं असेल, कित्येकांच्या मनात शंका असेल. मी एकच सांगतो की मी परिवर्तनाच्या चळवळीत होतो, आहे आणि कायम राहीन.”
पुढे बोलताना माने म्हणाले, “शाहू-फुले-आंबेडकरांचे विचार मी मांडत राहिलो. आता अचानक ही राजकीय भूमिका का घेतली? असा प्रश्न अनेकांना पडला असेल. पण, आजच्या परिस्थितीत वातावरण गढूळ झालेलं असताना, संविधान वाचवण्यासाठी एकमेव माणूस लढत आहे. उद्धव ठाकरेंच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे. हा निर्णय मी विचारपूर्वक घेतलेला आहे. संवेदनशील कलाकार आणि भारताचा नागरिक म्हणून मी सक्रिय राजकारणात उतरण्याचा निर्णय घेतला आहे. शिवसेना जी काही जबाबदारी देईल ती मनापासून पार पाडेन.”