विषारी दारु तयार केल्याप्रकरणी आरोपीची निर्दोष मुक्तता

0

सोलापूर,दि.१५: विषारी दारु तयार केल्याप्रकरणी आरोपीची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. यात हकिकत अशी की, मौजे तिल्हेहाळ तांडा, ता. द. सोलापूर, जि. सोलापूर येथे पोलीस कर्मचारी गस्तीवर असताना त्यांना तिल्हेहाळ तांडा येथे हातभट्टी दारु तयार करण्याचा व्यवसाय चालू आहे अशी बातमी गुप्तहेरामार्फत मिळाली. त्यामुळे पोलीसांनी तेथे जावून पाहिले असता तेथे एक इसम बॅरलमध्ये चुलीवर हातभट्टी दारु तयार करत असल्याचे निदर्शनास आले व पोलीसांना पाहताच तो इसम तेथून पळून गेला.

विषारी दारु तयार केल्याप्रकरणी आरोपीची निर्दोष मुक्तता

पोलीसांनी त्याठिकाणी छापा मारला त्यावेळी तेथे तीन प्लास्टीकच्या बॅरेलमध्ये एकूण ६०० लिटर प्रमाणे हातभट्टीची दारु अंदाजे किंमत १४,८०० रुपये असा मुद्देमाल आढळून आला. त्यानंतर पोलीसांनी आजूबाजूला चौकशी केली असता पळून गेलेला इसम हा संतोष चंदु पवार असल्याचे समजले. त्यानंतर पोलीसांनी भा.दं.वि. च्या कलम ३२८ अंतर्गत शिक्षापात्र गुन्हा दाखल करुन सत्र न्यायालयाकडे गुन्हा वर्ग केला. त्याप्रमाणे संबंधित पोलीसांनी सदर गुन्हयामध्ये तपास करुन दोषारोपपत्र दाखल केले होते.

सदरचा खटला सत्र न्यायाधीश, सोलापूर आर. एन. पांढरे यांच्याकडे चालला. सदर खटल्यादरम्यान सरकार पक्षाने एकूण ५ साक्षीदार तपासले. सदर साक्षीदारांपैकी तक्रारदार व इतर पोलीस कर्मचारी यांची उलटतपासणी सदर खटल्यास कलाटणी देणारी ठरली.

यात आरोपीतर्फे ॲड. अभिजीत इटकर यांनी उलटतपास घेतेवेळी अनेक महत्वाच्या बाबी न्यायालयासमोर आणल्या. त्यातल्या काही महत्वाच्या बाबी म्हणजे, सदर छापा टाकतेवेळेस संबंधित पोलीस अधिका-याने सदर पोलीस स्टेशन मधील नोंदवही मध्ये नोंद करणे गरजेचे असते पण अशी कुठलीही नोंदवही मे. कोर्टासमोर दाखल केलेली नाही.

सदर खटल्यातील अंतिम सुनावणी वेळी आरोपी तर्फे असा युक्तीवाद करण्यात आला की, तसेच सदर घटनास्थळावरुन मिळालेल्या पदार्थाच्या रासायनिक पृथ्थकरणाचा अहवालानुसार तो पदार्थ विषारी आहे अशा प्रकारचा कुठलाही पुरावा कोर्टासमोर दाखल केलेला नाही. तसेच सदर आरोपी याचा सुगावा हा पोलीसांच्या ऐकीव माहितीवर अवलंबून होता.

सदरचा आरोपीतर्फे केलेला युक्तीवाद ग्राहय धरुन आरोपी संतोष चंदू पवार राहणार तिल्हेहाळ तांडा, ता. द. सोलापूर यांची सत्र न्यायाधीश आर. एन. पांढरे यांनी निर्दोष मुक्तता केली.

यात आरोपीतर्फे ॲड. अभिजीत इटकर, ॲड. सुमित लवटे, ॲड. फैयाज शेख, यांनी काम पाहिले.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here