भारतीय संशोधकांचं नवं संशोधन, मक्याची ‘ही’ नवी जात 250 टक्क्यांहून जास्त प्रोटिन्स देणार

0

दि.25: आपल्या शरीराला प्रोटिन्सची आवश्यकता असते. अनेकजण प्रोटिन्स करिता मांसाहार करतात. कारण, मांसाहारी पदार्थांमध्ये प्रोटीनची पातळी उच्च असते. शाकाहारी व्यक्ती मांसाहार करू शकत नाहीत. अशा व्यक्तींसाठी दूध आणि दुग्धजन्य पदार्थ हाच सहज उपलब्ध असलेला प्रोटीनचा स्रोत असतो; मात्र आता शरीरातली प्रोटीनची (Protein) कमतरता भरून काढण्यासाठी मांस (Meat), अंडी, दूध आणि महागड्या प्रोटीन पावडरवर अवलंबून राहावं लागणार नाही. कारण भारतीय संशोधकांनी मक्याची (Maize/Corn) एक अशी जात विकसित केली आहे, की ज्यात प्रोटीन्सचं प्रमाण खूप जास्त असेल.

आपल्या आरोग्यासाठी मका खाण्याचे अनेक फायदे आहेत हे आपल्या सर्वांना माहितीच आहे. प्रोटीन्स, कार्बोहायड्रेट्स, फायबर्स, व्हिटॅमिन्स, मिनरल्स आणि अँटी-ऑक्सिडंट्स यांसारख्या अनेक पोषक घटकांनी (Nutrients) समृद्ध असलेल्या मक्याचा आपल्या आहारात विविध प्रकारे समावेश केला जातो. आता भारतीय शास्त्रज्ञांनी मक्याची एक नवीन जात विकसित केली आहे. त्या जातीच्या मक्यामध्ये विशेष प्रकारच्या प्रोटीन्सचं प्रमाण सर्वसाधारण जातीच्या मक्यापेक्षा अडीच पट म्हणजे 250 टक्के जास्त असतं. दैनिक जागरण वृत्तपत्रात प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, उत्तर प्रदेशातल्या वाराणसी इथल्या बनारस हिंदू विद्यापीठातल्या (BHU) शास्त्रज्ञांनी मक्याच्या या नवीन जातीचं नाव मालवीय गोल्डन मका-वन असं नाव ठेवलं आहे. मदन मोहन मालवीय हे बनारस हिंदू विद्यापीठाचे संस्थापक होते. त्यांचंच नाव मक्याच्या या जातीला देण्यात आलं आहे.

बीएचयूच्या (BHU) कृषी विज्ञान संस्थेत (Institute of Agricultural Sciences) विकसित करण्यात आलेली मक्याची ही नवी जात सर्वसामान्यांसाठी प्रोटीन्सचा मोठा स्रोत ठरणार आहे. बायोफोर्टिफाइड (Biofortified) मक्याची ही विशेष जात प्राध्यापक पी. के. सिंग (Prof. PK Singh) आणि मका प्रजनन/आनुवंशशास्त्र (Maize Breeding/Genetics) या विषयाचे प्राध्यापक जे. पी. शाही (Prof. JP Shahi) यांनी संयुक्तरीत्या विकसित केली आहे. बायोफोर्टिफाइड तंत्रज्ञानाचा वापर पिकांमध्ये पोषक घटकांचे प्रमाण वाढवण्यासाठी केला जातो.

तज्ज्ञ म्हणतात

प्राध्यापक जे. पी. शाही (Prof. JP Shahi) यांच्या मते, या मक्यामध्ये असलेल्या लायसिन (Lysine) आणि टिप्टोफॅन (Tiptophan) या ॲमिनो अ‍ॅसिड्समुळे आयर्न टॅब्लेटची गरज भासणार नाही. या जातीचा मका कॅल्शियम आणि रक्त तयार करण्याच्या प्रक्रियेला चालना देतो.

लायसिन आणि ट्रिप्टोफॅनचे फायदे

लायसिन (lysine) हे ॲथलीट्सच्या कामगिरीत सुधारणा करण्यासाठी, तसंच डायबेटिक रुग्णांसाठी अत्यंत उपयुक्त आहे. लायसिनमुळे रोगप्रतिकार यंत्रणा (Immune System) सुधारण्याबरोबरच, आतड्यांची कॅल्शियम शोषण्याची क्षमतादेखील वाढते. त्याचबरोबर लहान मुलांच्या सामान्य विकासासाठी आवश्यक असलेली प्रोटीन्स आणि एन्झाइम्सच्या निर्मितीमध्ये आणि संरक्षणामध्ये ट्रिप्टोफॅन महत्त्वपूर्ण भूमिका बजावतं. त्यामुळे स्नायू बळकट होतात.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here