Abdul Sattar: अब्दुल सत्तार यांनी आक्षेपार्ह विधानाबद्दल मागितली माफी

Abdul Sattar Supriya Sule अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांनी आक्षेपार्ह विधानाबद्दल माफी मागितली आहे

0

मुंबई,दि.7: अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांनी आक्षेपार्ह विधानाबद्दल माफी मागितली आहे. कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी राष्ट्रवादीच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधान केलं होतं. अब्दुल सत्तार यांच्या या विधानानंतर राष्ट्रवादी काँग्रेसने राज्यभरात तसंच मुंबईतल्या अब्दुल सत्तार यांच्या शासकीय बंगल्याबाहेर आंदोलन केलं. राज्यभरात राष्ट्रवादी काँग्रेसने केलेल्या या आंदोलनानंतर अब्दुल सत्तार नरमले आहेत. त्या वादग्रस्त विधानाबाबत आपण माफी मागतो, असं सत्तार म्हणाले आहेत.

सुप्रिया सुळे यांच्यावर केलेल्या टीकेनंतर अब्दुल सत्तार यांनी खेद व्यक्त केला आहे. मी कोणत्याही महिलेबाबत वक्तव्य केलेलं नसून जर कोणत्या महिलेचं मन दुखावलं असेल तर मी माफी मागतो, असं अब्दुल सत्तार म्हणाले आहेत. कोणत्याही महिलेबाबत असं वक्तव्य केलेलं नाही, मी सरसकट सगळ्यांबद्दल बोललो, पण जर कुठल्या महिलेच्या भावना दुखावल्या असतील, तर मी दिलगिरी व्यक्त करतो, अशी प्रतिक्रिया अब्दुल सत्तार यांनी दिली आहे.

‘मी कोणत्याही महिला भगिनीबद्दल अपशब्द बोललो नाही. आम्हाला जे लोक बदनाम करण्याचा प्रयत्न करत आहेत, त्यांच्याबद्दल मी बोललो. सुप्रिया सुळे आणि महिलांची मनं दुखावली जातील, असा कोणताही शब्द मी बोललो नाही. महिला भगिनींना त्यांची मनं दुखली असं वाटत असेल तर मी जरूर खेद व्यक्त करतो,’ असं अब्दुल सत्तार म्हणाले.

राष्ट्रवादी आक्रमक

दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस अब्दुल सत्तार यांच्या या वक्तव्यावरून आक्रमक झाली आहे. पुढच्या 24 तासांमध्ये अब्दुल सत्तार यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करा, अन्यथा राष्ट्रवादीच्या रोषाला सामोरं जावं लागेल, असा इशारा राष्ट्रवादीचे प्रवक्ते महेश तपासे यांनी दिला आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here