छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल वक्तव्य, ख्रिश्चन धर्मगुरू विरोधात गुन्हा दाखल

0

पणजी,दि.५: छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल वक्तव्य केल्यामुळे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांविषयी वादग्रस्त वक्तव्य करुन शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी ख्रिश्चन धर्मगुरु फादर बोलमेक्स परेरांविरोधात गोव्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बोलमेक्स परेरांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात यावा यासाठी वास्को पोलीस ठाण्याबाहेर राजपूत करणीसेना, बजरंग दल यांसह सुमारे १०० शिवप्रेमींनी गर्दी केली होती. शुक्रवारी रात्री उशिरा ही घटना घडली आहे. फादर बोलमेक्स परेरा हे दक्षिण गोव्यातली सेंट फ्रान्सिस झेव्हियर्स चर्चचे फादर आहेत.

काय आहे प्रकरण?

एका कथित व्हिडीओ क्लिपनुसार फादर बोलमेक्स परेररा यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्य केलं. “असे काही लोक आहेत ज्यांच्यासाठी शिवाजी महाराज हे दैवत आहेत. मला वाटतं की शिवाजी महाराज हे राष्ट्रीय नायक आहेत आपण त्यांचा योग्य आदर आणि सन्मान केलाच पाहिजे. मात्र ते देव किंवा दैवत नाही. यासाठी हिंदू बांधवांशी संवाद साधला पाहिजे आणि शिवाजी तुमचा देव आहे की राष्ट्रीय नायकाच्या रुपात तुम्ही त्याला पाहता? हे विचारलं पाहिजे. जर राष्ट्रपुरुष म्हणून तुम्ही शिवरायांकडे पाहात असाल तर त्याला दैवत कसं काय म्हणणार?” या आशयाचं वक्तव्य केलं होतं. त्यावरुन हा वाद निर्माण झाला आहे.

ख्रिश्चन धर्मगुरू विरोधात गुन्हा दाखल

यानंतर गोव्यात चांगलाच वाद निर्माण झाला. किरण नाईक मुरगाव येथील इतर गावकरी यांनी फादर परेरा यांच्या विरोधात पोलीस तक्रार दाखल केली. फादर परेरा यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबाबत केलेल्या वक्तव्यांमुळे आमच्या धार्मिक भावना दुखावल्या आहेत आणि यामुळे कायदा-सुव्यवस्थेची स्थिती बिघडू शकते असं या सगळ्यांनी तक्रारीत म्हटलं आहे. इंडियन एक्स्प्रेसने या विषयीचं वृत्त दिलं आहे.

FIR मध्ये असंही म्हटलं आहे की फादर परेरा यांनी जाणीवपूर्वक आपल्या प्रवचनाचा व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केला. छत्रपती शिवाजी महाराजांविषयी वादग्रस्त टिपण्णी करुन भावना भडवकण्यचाच त्यांचा उद्देश होता. छत्रपती शिवराय हे आमचं दैवत आहेत. आम्हा शिवप्रेमींच्या भावना या व्हिडीओमुळे दुखावल्या गेल्या आहेत. शिवप्रेमींनी या बाबत आक्रमक भूमिका घेतल्यानंतर फादर बोलमेक्स परेरा यांनी खेद व्यक्त करत माझ्या प्रवचनातला काही भाग निवडकपणे समोर आणला गेला असं म्हटलं आहे. मी असंही म्हटलं होतं की राष्ट्रपुरुषांमध्ये छत्रपती शिवरायांची गणना होते. तसंच शिवाजी महाराजांचं जात, धर्म, पंथ, भाषा यांच्यापलिकडचं आहे. विदेशातील लोकांनाही ते आदरणीय आहेत. असंही फादर परेरा यांनी दिलेल्या निवेदनात म्हटलं आहे.

याप्रकरणी काणकोण पोलीस ठाण्यात तक्रार देखील दाखल झाली. दरम्यान, शिवप्रेमी आणि हिंदू संघटनांनी आता फादर विरोधात गुन्हा दाखल करून अटकेची मागणी करत वास्को पोलीस स्टेशन बाहेर गर्दी निदर्शने सुरू केली होती.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here