सोलापूर,दि.१३ःआर.टी.ओ. अधिकाऱ्याला मारहाण करुन महिला कर्मचाऱ्याचा विनयभंग केल्याप्रकरणी न्यायालयाने एकाची निर्दोष मुक्तता केली आहे. यात हकिकत अशी की, दि. १८/०४/२०१५ रोजी सोलापूर येथील आर.टी.ओ. कार्यालयाच्या जवळ असलेले अतिक्रमण काढण्याची मोहिम राबविण्यात आलेली होती. त्यावेळी सदर केस मधील संशयित आरोपी महेश चव्हाण, रा. मोहिते नगर, संचार प्रेस समोर, होटगी रोड, सोलापूर यांची ही टपरी सदर मोहिमेत नष्ट करण्यात आलेली होती.
त्यामुळे सदर आरोपी हे आर.टी.ओ. कार्यालयातील तात्कालीन अधिकारी मेंडसीकर यांना जाब विचारण्याकामी त्यांच्या कार्यालयात गेले व तेथे उपस्थित असलेले इतर आर.टी.ओ. अधिकाऱ्यांना जाब विचारुन शिवीगाळ व मारहाण केली. तसेच तेथील उपस्थित महिला कर्मचारी यांच्या अंगाशी झोंबा-झोंबी केली व सरकारी कामात अडथळा निर्माण केला, म्हणून दि.१८/०४/२०१५ रोजी आर.टी.ओ. अधिकारी राजू नांगरे यांनी विजापूर नाका पोलीस स्टेशन, सोलापूर येथे सदर आरोपीविरध्द फिर्याद दाखल केली.
सदरकामी पोलीसांनी तपास करुन दोषारोप पत्र न्यायालयात दाखल केले व सदरचा खटला सत्र न्यायाधिश शिंदे यांच्या समोर चालला. सदर खटल्यामध्ये सरकारपक्षा तर्फे एकुण ६ साक्षीदार तपासण्यात आले. सदर खटल्याच्या कामकाजावेळी फिर्यादी राजू नांगरे व पोलीस तपास अधिकारी यांची उलट तपासणी सदर निकालास कलाटणी देणारी ठरली.
यात आरोपीतर्फे युक्तीवाद करतेवेळी अॅड. अभिजीत इटकर यांनी असा युक्तीवाद मांडली की, सदर सरकारी साक्षीदारांच्या उलट तपासणी मध्ये असे सिध्द झाले आहे की, घटना स्थळी सी. सी. टी. व्ही. कॅमेरे होते. परंतू सरकार पक्षाने सदरचे सी. सी. टी.व्ही. फुटेजस् मुद्दामहून लपवून ठेवलेले आहेत. तसेच सरकार पक्षाने असा कुठलाही पुरावा आणला नाही की ज्याच्या वरुन असे असे सिध्द होते की, सदर आरोपीची टपरी ही आर. टी.ओ. कार्यालया जवळ होती. तसेच विजापूर नाका पोलीस स्टेशन हे आर.टी.ओ. कार्यालयापासून काही मिनीटाच्या अंतरावर असून सुध्दा फिर्याद देण्यास अनेक तासांचा विलंब झालेला आहे व त्या विलंबास कुठलेही पुरक कारण सरकारपक्षा तर्फे देण्यात आलेले नाही.
तसेच सदर आरोपीने तात्कालीन आर.टी.ओ. अधिकाऱ्यांविरुध्द अनेकवेळेस संभाजी बिग्रेड या संघटनेमार्फत लेखी तक्रारी दिलेल्या होत्या. त्यामुळे सदरचा खोटा गुन्हा दाखल केल्याची शक्यता नाकारता येत नाही.
सदरचा युक्तीवाद ग्राहय धरुन सदर आरोपी महेश विश्वनाथ चव्हाण, रा. सोलापूर याची सत्र न्यायाधिश शिंदे यांनी निर्दोष मुक्तता केली.
यात आरोपीतर्फे अॅड. अभिजित इटकर, अॅड. दादासाहेब जाधव, अॅड. बंडू सटाळे, अॅड. युवराज आवताडे यांनी काम पाहिले.