मालकावर खुनी हल्ला, न्यायालयाने केली दोघांची निर्दोष मुक्तता

0

सोलापूर,दि.१५: मालकावर खुनी हल्ला केल्याप्रकरणी न्यायालयाने दोघांची निर्दोष मुक्तता केली आहे. यात हकिकत अशी की, आरोपी नामे १) लच्चु ऊर्फ लक्ष्मीपुत्र जगन्नाथ कळके, २) जगन्नाथ कळके, दोघे रा. चिमणी लिगाडे वस्ती, भोगांव, ता. उत्तर सोलापूर, जि. सोलापूर यांची फिर्यादी नामे बिराप्पा शरणप्पा आचेगांव व सकलेश श्रीकंटप्पा लिगाडे यांच्यावरती शेतामधील गाडी पार्किंग वरुन झालेल्या खुनी हल्ल्याप्रकरणी प्रथम न्यायदंडाधिकारी तापडिया यांनी निर्दोष मुक्तता केली.

सदर प्रकरणातील हकिकत अशी की, दि.३१/०७/२०१७ रोजी सकलेश श्रीकंटप्पा लिगाडे हे आपल्या शेतामध्ये त्यांची गाडी घेवून आले असता, त्यांना त्यांची गाडी शेतामधील स्थित लिंबाच्या झाडाखाली ती पार्क करावयाची होती पण तेथे यातील आरोपींचे म्हशी बांधलेल्या असल्यामुळे ती गाडी पार्क करता आली नाही. त्यामुळे सकलेश लिगाडे यांनी सदर आरोपींना त्या म्हशी काढण्याची विनंती केली असता, सदर आरोपींनी आरेरावीची भाषा वापरली व ही घटना बघुन फिर्यादी बिरप्पा आचेगाव हा सदर बाचाबाची मध्ये मध्यस्थी केली असता, सदर आरोपींनी तेथे पडलेल्या लोखंडी रॉड व दगडानी सदर फिर्यादी व सकलेश लिगाडे यांच्यावरती खुनी हल्ला केला. त्यामुळे सदर फिर्यादीने दि.३१/०७/२०१७ रोजी तालुका पोलीस स्टेशन येथे सदर आरोपीविरुध्द फिर्याद दिली.

सदर कामी सरकारपक्षाव्दारे एकुण ६ साक्षीदार तपासण्यात आले. त्यापैकी जखमी फिर्यादी व सकलेश लिगाडे तसेच प्रत्यक्ष घटना बघणारा साक्षीदार शाहिर सदाशिव गायकवाड यांची उलट तपासणी निर्णयाक ठरली.

सदर आरोपींतर्फे युक्तीवाद करतेवेळी ॲड. अभिजीत इटकर यांनी असा युक्तीवाद मांडला की, सदर आरोपी हे अनेक वर्षापासून सदर शेतातील मालक सकलेश लिगाडे यांची शेती बटईने करीत होते. परंतू सदर शेताचे मालक व त्यांच्या सख्या भावानी सदर आरोपींना अनेक वर्षांचा मेहताना दिलेला नसल्यामुळे सदर आरोपी हे त्या शेतामध्ये राहत होते. तसेच आरोपीतर्फे असा ही युक्तीवाद करण्यात आला की आरोपीकडून जो लोखंडी रॉड व दगड जप्त करण्यात आलेले आहेत त्यांच्यावरती रक्ताचा एक ही थेंब सापडलेला नाही व सदर जखमी फिर्यादी याच्या जखमेतून फार काळ रक्त वाहत होते असे वैद्यकिय अधिकाऱ्याचे म्हणणे होते. त्यामुळे सदर केस मध्ये सामोरे आलेले परिस्थितीजन्य पुराव्यामध्ये विसंगती दिसून येते त्यामुळे सरकार पक्ष खरी केस घेवून कोर्टा समोर आलेला नाही. त्यामुळे सदर आरोंपीची निर्दोष मुक्तता करण्यात यावी असा युक्तीवाद आरोपीचे वकिल ॲड. अभिजीत इटकर यांनी मांडला. सदर युक्तीवाद ग्राहय धरुन प्रथम न्यायदंडाधिकारी तापडिया यांनी आरोपींची निर्दोष मुक्तता केली.

यात आरोपीतर्फे ॲड. अभिजीत इटकर, ॲड. राम शिंदे, ॲड. संतोष आवळे, ॲड. राजु राठोड यांनी काम पाहिले.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here