Sharad Pawar PM Narendra Modi: राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांनी घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट

0

नवी दिल्ली,दि.6: Sharad Pawar PM Narendra Modi: राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांनी (Sharad Pawar) पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांची भेट घेतली आहे. राज्यात सत्ताधारी आणि विरोधक संघर्ष सुरु असतानाच दिल्लीत मोठी घडामोड झाल्याची पहायला मिळत आहे. केंद्रीय तपास यंत्रणांकडून राज्यातील महाविकास आघाडी सरकारमधील नेत्यांच्या विरोधात कारवाई सुरू असताना दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. या दोन्ही नेत्यांमध्ये संसदेतील पंतप्रधान कार्यालयात भेट झाली. दोघांमध्ये जवळपास 20 ते 25 मिनिटे चर्चा झाली. या दोन्ही नेत्यांमध्ये याआधी मागील वर्षी 17 जुलै रोजी भेट झाली होती. त्यावेळी देखील विविध मुद्यांवर चर्चा झाली होती. मात्र, महाराष्ट्रात सुरू महाविकास आघाडी सरकार आणि भाजप, केंद्रीय तपास यंत्रणा यांच्यात संघर्ष सुरू आहे. या पार्श्वभूमीवर ही भेट झाल्याने चर्चांना उधाण आले आहे.

शरद पवार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात याआधीही भेटी झाल्या आहेत. देशाच्या राजकारणातील मोठे नेते असणाऱ्या शरद पवार आणि मोदींमध्ये भेट झाल्यानंतर त्याची नेहमीच चर्चा होत असते. मात्र यावेळी शरद पवारांनी घेतलेली भेट आणि महाराष्ट्रातील घडामोडी यामुळे याची चर्चा रंगली आहे. महाराष्ट्रात ईडीकडून सत्ताधारी नेत्यांवर कारवाई सुरु असून आरोप-प्रत्यारोप सुरु आहेत तर दुसरीकडे पाच राज्यांच्या निवडणुकीत भाजपाला मिळालेलं यश पाहता या निवडणुकीचं महत्व वाढलं आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि शरद पवार यांची ही वन टू वन भेट झाली. दोघांमध्येच 20 ते 25 मिनिटं चर्चा झाली. भेटीचा विषय नेमका समजू शकलेला नाही. पण राजकीय चर्चा झाली असल्याची दाट शक्यता आहे. राज्यातील परिस्थितीबाबत ही चर्चा झाली असल्याची माहिती सूत्रांनी दिली. शरद पवार आणि नरेंद्र मोदी यांची भेट होते तेव्हा त्याची कायम चर्चा होते. आजच्या भेटीचं टायमिंगही महत्त्वाचं आहे. महाविकास आघाडीच्या नेत्यांविरोधात केंद्रीय तपास यंत्रणांनी आक्रमक भूमिका घेतली असल्याचे दिसून येत आहे. मंगळवारी, ईडीने शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांची मालमत्ता जप्त केली होती. त्याआधी सकाळीच राज्य सरकारने ईडीच्या अधिकाऱ्यांविरोधात असलेल्या कथित आरोपांची चौकशी करण्यासाठी एसआयटीची स्थापना केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे मोठे नेते समजले जाणारे अनिल देशमुख आणि नवाब मलिकदेखील तुरुंगात आहेत.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here