सोलापूर,दि.5: मुंबई उच्च न्यायालयाने (Mumbai High Court) दोषारोपपत्र दाखल न करण्याचा आदेश असताना सुध्दा एम आय एम (MIM) पक्षाचे नगरसेवक गाजी जाहगिरदार वगैरे 9 आरोपी विरुद्ध दोषारोप पत्र दाखल केल्याने सदर बझार पोलीस स्टेशनला मुख्य न्यायदंडाधिकारी यांनी दोषारोप पत्र परत पाठवावे असा आदेश सत्र न्यायाधीश ऋचा खेडेकर यांनी पारीत केला.
यात हकीकत अशी की, दि.4/11/2016 रोजी नई जिंदगी येथे मारहाण झालेल्या मुकरी सालार, इम्रान सालार, युसुफ सालार, दादा सालार यांना पाहण्यासाठी सिव्हिल हॉस्पिटल येथे गेलो असता एम आय एम पक्षाचे नगरसेवक गाजी सादिक जहागीरदार वगैरे 9 जणांनी चाकू, लोखंडी पाइप, लोखंडी गज याच्या साह्याने मारहाण केली तसेच पाच तोळ्याची सोन्याची चैन व सात ते आठ हजार रुपये रोकड जबरदस्तीने हिसकावून नेली अशा आशयाची खाजगी फिर्याद आफ्रीन वाजिद सालार यांनी सोलापूर येथील मुख्य न्यायदंडाधिकारी यांच्या न्यायालयात दाखल केलेली होती.
त्यांनी फिर्याद पोलिसाकडे तपासासाठी पाठवावी अशी केलेली मागणी मुख्य न्यायदंडाधिकारी यांनी फेटाळून लावल्याने त्या आदेशाविरुद्ध आफ्रीन वाजिद सालार यांनी सत्र न्यायालयात धाव घेतलेली होती. सोलापूर सत्र न्यायालयाने आफ्रीन सालार यांची मागणी मान्य करून त्यांच्या त्याचे फिर्यादीचा भा.द.वि. कलम 307 प्रमाणे तपास पोलिसांनी करावा, यासाठी ती फिर्याद मुख्य न्यायदंडाधिकारी यांनी पोलिसांकडे पाठवावी, असा आदेश पारित केला.
त्या आदेशाविरुद्ध आरोपींनी मुंबई उच्च न्यायालयात रिट पिटीशन दाखल केलेले होते. त्यामध्ये मुंबई उच्च न्यायालयाने पुढील आदेश होईपावेतो सदर बाजार पोलिसांनी दोषारोप पत्र दाखल करू नये असा आदेश पारित केलेला होता. असे असतानाही पोलिसांनी आरोपीविरुद्ध दोषारोप पत्र मुख्य न्यायदंडाधिकारी यांच्या न्यायालयात दाखल केलेले होते. सदर दोषारोप दाखल केलेला खटला हा आरोपी गाजी जहागीरदार यांनी सालार यांच्याविरुद्ध दाखल केलेल्या भा द वि 307 च्या खटल्याची काउंटर कंप्लेंट असल्याने सत्र न्यायालयाने भा द वि 324 प्रमाणे दाखल केलेले प्रस्तुतचे दोषारोप पत्राचा खटला सत्र न्यायालयात वर्ग करून घेतलेला होता.
यात आरोपी तफे युक्तिवाद करताना ॲड.संतोष न्हावकर यांनी मुंबई उच्च न्यायालाचा दोषारोपपत्र दाखल न करण्याचा आदेश असताना पोलिसांनी दोषारोपपत्र दाखल केलेले आहे, मुंबई उच्च न्यायालयासमोर सदर रिट अदयाप प्रलंबित आहे, त्यामुळे खटला चालविणे योग्य होणार नाही असा युक्तिवाद केला. सदरचा युक्तिवाद ग्राहय धरून सत्र न्यायाधीश यांनी पोलिसांनी दाखल केलेल्या दोषारोप पत्र मुख्यन्यायदंडाधिकारी यांनी सदर बझार पोलिसांकडे परत पाठवावे असा आदेश पारीत केला.
यात आरोपी एम आय एम पक्षाचे नगरसेवक गाजी जाहिगरदार वगैरे ९ जणांतफे ॲड. संतोष न्हावकर, ॲड. शैलेशकुमार पोटफोडे, ॲड. राहुल रूपनर, ॲड. वैष्णवी न्हावकर, ॲड. मीरा पाटील, ॲड. अंबिका आडकी, ॲड. नागेश थोरात यांनी काम पाहिले.