नागपूर, दि.३१: विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या विरोधात याचिका दाखल करणाऱ्या वकील सतीश उके (Satish Uke) यांच्या घरावर ईडीची धाड पडली आहे. नागपुरातील (Nagpur) वकील सतीश उके (Satish Uke) यांच्या घरावर सक्तवसुली संचालनालयाने (ED) आज सकाळी छापेमारी सुरू केली आहे. ईडीचे पथक सकाळीच सतीश उके यांच्या नागपुरातील घरी दाखल झाले आहेत. ईडीच्या या कारवाईमुळे वकील व राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. ईडीने कोणत्या कारणाने छापा टाकला हे अद्याप स्पष्ट होऊ शकलेले नाही. भूखंड व्यवहारातील आर्थिक प्रकरणाच्या तपासासाठी ईडीने ही धाड टाकल्याचे सांगण्यात येते.
सतीश उके हे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांचे वकील असून त्यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या विरोधात निवडणूक याचिका दाखल केली होती. त्यामुळं ते अधिक चर्चेत आले होते. गेल्या काही वर्षांपासून उके यांनी भाजप नेत्यांविरोधातन्यायालयात याचिका दाखल केल्या. तसेच पत्रकार परिषदेच्या माध्यमातूनही ते भाजप नेत्यांवरआरोप करीत आहेत. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचे वकील, अशीही त्यांची ओळख आहे.
आज सकाळीच ईडीच्या अधिकाऱ्यांनी उके यांच्या नागपुरातील घरी छापेमारी सुरू केली आहे. काही अधिकारी हे उके यांच्या घरी असून काही महत्त्वाच्या कागदपत्राची तपासणी करत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. गुरुवारी सकाळी ७ वाजताच्या सुमारास ईडीचे मुंबईतील पथक केंद्रीय राखीव पोलिसदलाच्या जवानांसह उके यांच्या घरी धडकले. पथकात महिला अधिकाऱ्यांचाही समावेश आहे. गेल्या दोन तासांपासून ईडी उके यांच्या घराची झडती घेत असून त्यांची चौकशी करीत आहे.