सोलापूर,दि.29: शिवसेनेचे माजी सहसंपर्कप्रमुख लक्ष्मीकांत ठोंगे पाटील (Laxmikant Thonge Patil) यांच्यावर हल्ला करण्यात आल्याची घटना सोलापूरात घडली आहे. युवा सेनेच्या मेळाव्यात माजी शिवसेना सहसंपर्कप्रमुख लक्ष्मीकांत ठोंगे पाटील (Laxmikant Thonge Patil) यांच्यावर हल्ला करण्यात आला. याप्रकरणी शिवसेनेचे नगरसेवक गणेश वानकर यांच्यासह नऊ जणांविरुद्ध सदर बाजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही घटना सोमवारी दुपारी 12:30 वाजेच्या सुमारास हुतात्मा स्मृती मंदिर येथे झाली. श्रीकांत राजाराम भोईटे, उमेश ताकमोगे, संदीप हंचाटे, शहाजी भोसले, गणेश वानकर व अन्य दोन ते तीन जण ( सर्व रा. सोलापूर ) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची आहेत. या मेळाव्यास युवा सेनेचे प्रदेश सचिव वरुण सरदेसाई, आमदार तानाजी सावंत (Tanaji Sawant) उपस्थित होते.
सोलापूरमधील (Solapur) हुतात्मा स्मृती मंदिर येथे वरूण सरदेसाई यांच्या उपस्थितीत युवासेना मेळावा आयोजित केला होता. या मेळाव्यासाठी शिवसैनिकांनीही मोठ्या संख्येने गर्दी केली होती. त्यावेळी शिवसेनेचे माजी सहसंपर्क प्रमुख लक्ष्मीकांत ठोंगे पाटील (Laxmikant Thonge Patil) यांना शिवसैनिकांकडून धक्काबुक्की करण्यात आली. यामुळे शिवसेनेतील गटबाजी पुन्हा चव्हाट्यावर आली आहे.
युवा सेनेचे प्रदेश सचिव वरुण सरदेसाई, आमदार तानाजी सावंत यांच्या आगमनावेळी हुतात्मा स्मृती मंदिर येथे माजी सहसंपर्कप्रमुख लक्ष्मीकांत ठोंगे पाटील गेले होते. मात्र, नऊ जणांनी त्यांना धक्काबुक्की केली. ठोंगे पाटील यांनी सदर बाजार पोलीस ठाण्यात नऊ जणांविरुद्ध फिर्याद दिली आहे. भादंवि कलम 323, 143, 147, 148 प्रमाणे गुन्हा दाखल झाला आहे. तपास पोलीस उपनिरीक्षक प्रशांत क्षीरसागर करीत आहेत.