८ वर्षीय मुलाच्या अपहरणप्रकरणी आरोपीची जामीनावर मुक्तता

0

सोलापूर,दि.२३: ८ वर्षीय मुलाच्या अपहरणप्रकरणी आरोपीला जामीन मंजूर करण्यात आला आहे. यात हकिकत अशी की, दिनांक ३०.१२.२०२१ रोजी अपहारीत मुलगा नामे पृथ्वीराज सुरेश बिराजदार, रा. धोत्री, ता. दक्षिण सोलापूर हा सकाळच्या वेळेस शाळेत जाण्यासाठी घरातून निघाला परंतू दुपारी २:३० वाजेपर्यंत तो घरी परत न आल्यामुळे त्याच्या घरातील लोकांनी शोधाशोध सुरू केली. तरीही तो मुलगा कोठेही आढळला नाही.

त्यामुळे त्यांच्या घरच्यांनी वळसंग पोलिस स्टेशन येथे सदरचा मुलगा हरविला असल्याबद्दलची फिर्याद दाखल केली. सदर वळसंग पोलिसांनी सदर मुलाचा शोध घेतला असता तपासा दरम्यान त्यांच्या असे लक्षात आले की, सदर मुलाचे प्रॉपर्टीच्या कारणावरून त्याच्या जवळच्या नातेवाईकांनी इतर लोकांच्या मदतीने अपहरण केलेले आहे. त्याप्रकारे सदर पोलिसांनी आरोपींचा माग काढला असता सदर अपहृत मुलगा व आरोपी हे सांगली जिल्ह्यातील कुंडल गांवी मिळून आले. या प्रकरणी पोलिसांनी एकूण ५ आरोपींना अटक केली.

सदर ५ आरोपींपैकी आरोपी केदार बाळासाहेब शिवपुजे, रा. मु. पो. कुंडल, ता. पुळूस, जि. सांगली यांनी ॲड. अभिजीत इटकर व ॲड. बंडू सटाले यांच्यामार्फत सत्र न्यायाधिश सोलापूर यांच्याकडे जामीनाचा अर्ज दाखल केला.

यात आरोपीतर्फे युक्तिवाद करतेवेळी ॲड. अभिजीत इटकर यांनी असा मुद्दा मांडला की , एका आरोपीच्या कबुली जबाबावर दुसऱ्या आरोपीस अटक करता येणार नाही त्याकामी एका सर्वोच्च न्यायालयाचा अत्यंत गाजलेला निवाडा दाखल करण्यात आला. तसेच गुन्ह्यामध्ये सदर आरोपीचा कितपत सहभाग आहे व सदर आरोपीने कितपत गुन्हा करतेकामी मुख्य गुन्हेगारांना मदत केलेली आहे, हे ही बघणे अत्यंत महत्त्वाचे आहे.

सदर मुद्दयांचा विचार करून सदर आरोपी नामे केदार बाळासाहेब शिवपुजे , रा. मु. पो. कुंडल, ता. पुळूस, जि. सांगली याची सत्र न्यायाधिश खेडेकर यांनी जामीनावर मुक्तता केली. यात आरोपीतर्फे ॲड. अभिजीत इटकर, ॲड. बंडू सटाले, ॲड. दादासाहेब जाधव, ॲड. युवराज आवताडे यांनी काम पाहिले.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here