सोलापूर, दि.24 : सोलापूरच्या गिरणगावचा इतिहास आणि कामगारांना न्याय मिळवून देणाऱ्या एका कामगार पुत्राचा ऐतिहासिक लढा जगासमोर आणण्यासाठी “संघर्षयात्री” या चित्रपटाची निर्मिती करण्यात येत असल्याची घोषणा सॉलिवूड फिल्म कंपनीचे प्रवर्तक आणि दिग्दर्शक प्रा. बाबुराव माने यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत केली.
कंदलगाव येथील “मोहिनी रिसॉर्ट अँड वॉटर पार्क” येथे आयोजित पत्रकार परिषदेस कामगारांसाठी लढा देणारे व ज्यांच्या जीवनावर चित्रपट आहे ते कुमार करजगी, कार्यकारी निर्माते, अभिनेते संजय शिंदे, संजय जोगीपेठकर, गायक मोहम्मद अय्याज यांची यावेळी उपस्थिती होती. सॉलिवूड फिल्म कंपनी आणि नागेश करजगी फिल्म सिटी यांच्या संयुक्त विद्यमाने हा चित्रपट रुपेरी पडद्यावर येत आहे. यावेळी बोलताना चित्रपटाचे दिग्दर्शक बाबुराव माने यांनी सांगितले की, गिरणगावचा इतिहास मांडताना अत्याधुनिक प्रणालीचा वापर करण्यात येणार असून तांत्रिक दृष्ट्या हा चित्रपट दर्जेदार बनविण्यावर आमचा भर असणार आहे.
35 वर्षे कामगारांसाठी लढा देणारे कुमारदादा करजगी यांनी, सोलापूरच्या गिरणगावचा इतिहास चित्रपटाच्या माध्यमातून जगासमोर येत असल्याबद्दल आनंद व्यक्त केला. पर्यायाने मी दिलेला लढाही या चित्रपटातून आहे त्या स्वरूपात जनतेसमोर येईल, असे ते म्हणाले. सोलापुरातील पत्रकारच निर्मिती करीत असल्यामुळे या चित्रपटात नेमकी आणि योग्य माहिती प्रेक्षकांसमोर येईल, असा विश्वास करजगी यांनी व्यक्त केला. या चित्रपटात कुमार करजगी भूमिका साकारणार आहेत. तसेच चित्रपटात स्थानिक कलाकारांना प्राधान्य दिले जाणार आहे.
यावेळी ज्येष्ठ वकील शिवशंकर घोडके, प्रदीप तडकल, यश करजगी, मल्लिनाथ याळगी, अजय पोन्नम आदी उपस्थित होते. प्रास्ताविक संजय शिंदे यांनी केले तर संजय जोगीपेठकर यांनी आभार मानले.