Home राजकारण सोलापूर शहर मोफत बससेवेचे मॉडेल बनवणार: राजेंद्र मदने

सोलापूर शहर मोफत बससेवेचे मॉडेल बनवणार: राजेंद्र मदने

0

सोलापूर,दि.७: आगामी काळात जगभरात सोलापूर शहर मोफत बससेवेसाठी प्रसिद्ध होईल आणि त्याचे एक उत्तम मॉडेल बनवण्याचा प्रयत्न केला जाईल, असा विश्वास सोलापूरचे माजी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी राजेंद्र मदने यांनी व्यक्त केला. ‘आप्पाजी द्वारकोजी मदने फाऊंडेशन’च्या वतीने सोलापूर शहरातील दोन मार्गांवर मोफत प्रवासी बससेवा सुरू करण्यात आली, त्यावेळी ते बोलत होते.

सोलापूर महानगरपालिकेच्या आवारात शनिवारी झालेल्या या कार्यक्रमास सोलापूरचे महापौर विनायक कोंड्याल, आमदार सुभाष देशमुख, उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर, आयुक्त सचिन ओंबासे, नगरसेवक बिज्जू प्रधाने, नगरसेविका भाग्यश्री, नगरसेवक सात्विक बडवे, महादेव आप्पाजी मदने, उत्तम आप्पाजी मदने, बाळासाहेब मदने आणि अनिल कानडे आदी मान्यवर उपस्थित होते.

या प्रसंगी मनोगत व्यक्त करताना राजेंद्र मदने म्हणाले, “सोलापूरमध्ये उपप्रादेशिक परिवहन अधिकारी म्हणून काम करत असताना, मला महानगरपालिकेचे परिवहन अधिकारी म्हणूनही काम करण्याची संधी मिळाली आणि याद्वारे मला सोलापूरकरांची सेवा करता आली. तोट्यात आलेल्या परिवहन बससेवेला कामगार व शहरवासीयांच्या सहकार्याने नफ्यात आणून प्रवाशांना उत्तम सेवा देण्याचा आम्ही प्रयत्न केला आणि त्यात यशही आले. कामगार व मजुरांचे शहर असलेल्या सोलापूरमधील तीव्र गरिबीची जाणीव मला त्यावेळी झाली होती. परिवहनचे कर्मचारीही अतिशय हलाखीच्या परिस्थितीत जीवन जगत होते, त्यांच्यासाठी काहीतरी करावे याच हेतूने मी परिवहनचा कार्यभार सांभाळला होता. त्याच परिवहनला व सोलापूरच्या बससेवेला पुन्हा चांगले दिवस यावेत आणि येथील जनतेला मोफत व सुरक्षित बससेवा मिळावी, या उद्देशाने ‘आप्पाजी द्वारकोजी मदने फाऊंडेशन’च्या वतीने निलम नगर ते राजेंद्र चौक या मार्गांवर दोन मोफत बससेवा सुरू करण्यात येत आहेत. या बसेसचा संपूर्ण दैनंदिन खर्च फाऊंडेशनतर्फे केला जाणार असून प्रवाशांसाठी ही सेवा पूर्णपणे मोफत असेल.”

आमदार सुभाष देशमुख म्हणाले, “आरटीओ आणि परिवहन अधिकारी म्हणून सेवा बजावताना राजेंद्र मदने यांनी सोलापूरकरांसाठी उत्कृष्ट कामगिरी केली. संपूर्ण राज्यात त्यांनी आपल्या कामाचा ठसा उमटवला असून अनेक गरजू व गरीबांना मदत केली आहे. प्रामाणिकपणे कर्तव्य बजावणारे आणि निवृत्तीनंतरही सोलापूरचा सातत्याने विचार करणारे अधिकारी म्हणून ते नेहमी सोलापूरकरांच्या स्मरणात राहतील.”

महापौर विनायक कोंड्याल यांनी, “राजेंद्र मदने यांनी सोलापूरकरांबद्दल जे प्रेम दाखवले आहे, ते अतिशय कौतुकास्पद आहे. या उपक्रमासाठी त्यांना महानगरपालिकेकडून सर्वतोपरी सहकार्य केले जाईल,” असे आश्वासन दिले. तसेच, आयुक्त सचिन ओंबासे यांनीही फाऊंडेशनतर्फे राबवलेल्या या स्तुत्य उपक्रमाचे विशेष कौतुक केले.

सोलापूरमधील प्रसिद्ध उद्योजक, व्यापारी आणि दानशूर व्यक्तींनी पुढे येऊन मोफत बससेवेच्या या उपक्रमात सक्रिय सहभाग घेतल्यास, सोलापूर शहर मोफत बससेवेचे एक आदर्श मॉडेल बनण्यास वेळ लागणार नाही, असे आवाहन यावेळी करण्यात आले.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

कॉपी करू नका.