मुंबई,दि.७: कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आणि डीपफेक तंत्रज्ञानाच्या अमर्याद गैरवापरामुळे आता केवळ चेहरे किंवा फोटोच नव्हे, तर माणसाचा मूळ आवाजही सुरक्षित उरलेला नाही. एआय तंत्रज्ञानाद्वारे होणारी आवाजाची नक्कल आणि सायबर गुन्हेगारी रोखण्यासाठी इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी (Giorgia Meloni) यांनी एक ऐतिहासिक पाऊल उचलले आहे. मेलोनी यांनी थेट आपल्या आवाजाचे कायदेशीर हक्क (Voice Trademark) मिळवण्यासाठी अर्ज दाखल केला असून, असा निर्णय घेणाऱ्या त्या जगातील पहिल्या राष्ट्रप्रमुख ठरल्या आहेत.
नक्की काय आहे प्रकरण?
युरोपियन युनियन इंटेलेक्चुअल प्रॉपर्टी ऑफिसकडे (EUIPO) मेलोनी यांनी ५ ऑक्टोबर रोजी अधिकृत अर्ज सादर केला आहे. या अर्जासोबत त्यांनी इटालियन भाषेतील “मी जॉर्जिया मेलोनी आहे” या वाक्याची ४ सेकंदांची ऑडिओ क्लिप जोडली आहे. एआय व्हॉईस क्लोनिंग आणि डीपफेक कंटेंस्टच्या वाढत्या आव्हानाला कायदेशीर उत्तर देण्यासाठी हा अर्ज करण्यात आला आहे.
एआय व्हॉईस क्लोनिंगचे गंभीर धोके:
1. सायबर फसवणूक व आर्थिक नुकसान: एआयच्या मदतीने काही सेकंदांच्या ऑडिओ सॅम्पलवरून हुबेहूब आवाज तयार करता येतो. याचा वापर करून नातेवाईक किंवा ओळखीच्या व्यक्तींच्या नावाने पैशांची मागणी करण्याचे प्रकार जगभरात वेगाने वाढत आहेत.
2. लोकशाही व निवडणुकांवर परिणाम: राजकीय नेत्यांचे खोटे ऑडिओ किंवा व्हिडिओ बनवून मतदारांची दिशाभूल केली जाण्याचा मोठा धोका निर्माण झाला आहे.
3. अश्लील डीपफेक चा वापर: मेलोनी स्वतः यापूर्वी एआय-जनरेटेड आक्षेपार्ह कंटेंस्टच्या शिकार ठरल्या आहेत.
‘व्हॉईस ट्रेडमार्क’मुळे काय बदलेल?
जरी ट्रेडमार्कमुळे तांत्रिकदृष्ट्या एआयद्वारे होणारी आवाजाची कॉपी लगेच थांबणार नसली, तरी याला एक भक्कम कायदेशीर संरक्षण मिळेल.
कडक कायदेशीर कारवाई: कोणत्याही डिजिटल प्लॅटफॉर्म किंवा टेक कंपनीने परवानगीशिवाय मेलोनी यांच्या आवाजाचा गैरवापर केल्यास त्यांच्यावर थेट ‘बौद्धिक संपदा चोरी’चा (Intellectual Property Theft) आंतरराष्ट्रीय खटला चालवला जाऊ शकेल.
कंटेंट हटवणे बंधनकारक: असा अवैध ऑडिओ किंवा व्हिडिओ इंटरनेटवरून तातडीने हटवणे संबंधित कंपनीला कायद्याने भाग पडेल.
भविष्यात एआयच्या धोक्यांपासून सुरक्षित राहण्यासाठी हा निर्णय जागतिक स्तरावर सायबर सुरक्षेचा एक नवीन मानदंड ठरेल, असे मत तंत्रज्ञान विश्लेषकांनी व्यक्त केले आहे.








