Home महाराष्ट्र अभिजीत दिपकेंनी नेहरू अन् आंबेडकर यांच्याबाबत केलेल्या विधानावरून वाद पेटला

अभिजीत दिपकेंनी नेहरू अन् आंबेडकर यांच्याबाबत केलेल्या विधानावरून वाद पेटला

0
अभिजीत दिपके-सचिन खरात

मुंबई,दि.३: कॉकरोच जनता पार्टीतर्फे (सीजेपी) दादर येथील शिवाजी पार्क परिसरात आयोजित आंदोलनादरम्यान अभिजीत दिपके यांनी केलेल्या एका राजकीय विधानामुळे नवा राजकीय वाद पेटला आहे. पंडित जवाहरलाल नेहरू आणि महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संदर्भात दिपके यांनी केलेल्या टिप्पणीवर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (सचिन खरात गट) कडून तीव्र संताप व्यक्त करण्यात आला असून, पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष सचिन खरात यांनी दिपके यांच्यावर निशाणा साधला आहे.

दिपके यांनी आपल्या वक्तव्याबद्दल तातडीने जाहीर माफी मागावी, अन्यथा आंबेडकरी जनता त्यांच्या तोंडाला काळे फासून तीव्र आंदोलन करेल, असा इशारा सचिन खरात यांनी दिला आहे.

नेमका वाद कशामुळे?

शिवाजी पार्क येथील आंदोलनात बोलताना अभिजीत दिपके म्हणाले होते की, “देशातील जनतेला मतदानाचा हक्क माहीत नव्हता, त्या काळात पंडित नेहरू आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर या दोघांनी मिळून लोकांना हा अधिकार दिला. जर महात्मा गांधी हे या देशाचा आत्मा असतील, तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर देशाचा कणा आहेत आणि पंडित नेहरू हे या देशाचे मन आहेत.”

दिपकेंच्या या विधानावर सचिन खरात यांनी कडक शब्दांत आक्षेप नोंदवला.

‘बाबासाहेबांना काँग्रेसमय करण्याचा प्रयत्न खपवून घेणार नाही’

सचिन खरात यांनी दिपकेंच्या भूमिकेचा समाचार घेताना स्पष्ट केले की, “या देशातील प्रत्येक नागरिकांना मतदानाचा मूलभूत अधिकार आणि राज्यघटना ही केवळ आणि केवळ डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनीच दिली आहे. त्यामुळे या अधिकाराचे श्रेय नेहरूंना देऊन महामानवांचा इतिहास बदलण्याचा किंवा त्यांना ‘काँग्रेसमय’ करण्याचा प्रयत्न करू नये.”

खरात पुढे म्हणाले, “दिपके आंबेडकरांना देशाचा कणा म्हणतात, पण डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे केवळ कणा नसून या देशाचा मुख्य चेहरा आणि ‘होल अँड सोल’ आहेत. भूतकाळात याच काँग्रेसने भंडारा लोकसभा पोटनिवडणुकीत बाबासाहेबांच्या विरोधात प्रचार केला होता आणि दलितांच्या व्यथा मांडण्यासाठी ते सायमन कमिशनला भेटायला गेले असता काँग्रेसने त्यांना देशद्रोही म्हटले होते.”

आंदोलनाचा इशारा

अभिजीत दिपके यांनी ऐतिहासिक तथ्यांची तोडमोड करून चुकीचे विधान केले असल्याचा आरोप करत खरात यांनी त्यांना तात्काळ सार्वजनिक माफी मागण्याचे आवाहन केले आहे. दिपकेंनी जाहीर माफी न मागितल्यास आंबेडकरी कार्यकर्त्यांकडून आक्रमक पवित्रा घेतला जाईल, असा इशाराही त्यांनी दिला.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

कॉपी करू नका.