सोलापूर,दि.२०: कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) वर आंधळा विश्वास ठेवणे लष्करी ताकदीसाठी किती घातक ठरू शकते, याचा एक धडकी भरवणारा प्रकार समोर आला आहे. एआय चॅटबॉटने दिलेल्या एका चुकीच्या माहितीमुळे अमेरिका आणि चीन थेट लष्करी संघर्षाच्या उंबरठ्यावर येऊन पोहोचले होते.
काय घडला होता नेमका थरार?
पश्चिम आशियामध्ये तैनात असलेल्या अमेरिकन सैन्याला एका चिनी जहाजाबद्दल एआय-जनरेटेड गुप्तचर अहवाल मिळाला होता. या जहाजातून अणुवस्त्रांशी संबंधित सुटे भाग वाहून नेले जात असल्याचा दावा एआय चॅटबॉटने केला होता.
अहवाल मिळताच अमेरिकन सैन्य अॅक्शन मोडमध्ये आले. ते जहाज रोखण्यासाठी सशस्त्र कमांडोज आणि लढाऊ विमानांची फौज सज्ज झाली होती. मात्र, प्रत्यक्ष कारवाई सुरू होण्यापूर्वी अधिकाऱ्यांनी अहवालाची पुन्हा सखोल तपासणी केली. त्यावेळी एआयने जहाजावरील सामानाची संपूर्ण चुकीची ओळख पटवल्याचे आणि तो अहवाल बनावट असल्याचे उघड झाले. यामुळे वेळीच एक मोठा आंतरराष्ट्रीय वाद टळला.
चीनच्या भीतीपोटी एआयचा घाईघाईत वापर
युद्धात वेगाने निर्णय घेण्याच्या नादात अमेरिकन सैन्य एआयचा वापर वाढवत आहे. एआय तंत्रज्ञानात चीन किंवा इतर प्रतिस्पर्धी देश पुढे निघून गेले तर अमेरिका मागे पडेल, अशी भीती अमेरिकन अधिकाऱ्यांना वाटत आहे. याच दबावातून जानेवारीत संरक्षण मंत्रालयाने एआय धोरण जाहीर करत सुमारे ३० लाख सैनिकांपर्यंत एआय टूल्स पोहोचवण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे.
स्पष्ट नियमावलीचा अभाव अन् संयुक्त राष्ट्रांचे आरोप
सैन्यात एआयचा वापर वेगाने वाढत असला तरी, मानवी हस्तक्षेप आणि सुरक्षेचे कोणतेही स्पष्ट नियम अद्याप तयार नाहीत. वेगवेगळ्या लष्करी विभागांमध्ये एआयच्या विश्वासार्हतेबाबत एकसूत्रीपणा नाही.
दरम्यान, इराण युद्धातील शाळा आणि रहिवासी भागांवर झालेल्या हल्ल्यांमध्ये एआयने जुनी व चुकीची माहिती दिल्यामुळे मोठे नुकसान झाल्याचा संशय आहे. या चुकीच्या माहितीवर आधारित हल्ल्यांमुळे आता संयुक्त राष्ट्राने (UN) अमेरिकेवर युद्ध गुन्ह्यांचे गंभीर आरोप ठेवले आहेत.








