Home महाराष्ट्र मनोज जरांगेंना मोठं करण्यात भाजप सरकारचा मोठा हात: अजय बारसकर

मनोज जरांगेंना मोठं करण्यात भाजप सरकारचा मोठा हात: अजय बारसकर

0
Ajay Baraskar-Manoj Jarange Patil

मुंबई,दि.१७: मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी तब्बल २० दिवसांनंतर आपले आमरण उपोषण मागे घेतले असून, सरकारने मागण्या मान्य करण्यासाठी ठरवून दिलेली मुदत स्वीकारली आहे. त्यामुळे राज्यभरात सुटकेचा निश्वास सोडला जात असतानाच, मराठा आरक्षणाचे अभ्यासक अजय महाराज बारसकर (Ajay Baraskar) यांनी जरांगे पाटील यांच्यावर धक्कादायक आणि गंभीर आरोप केले आहेत. बंद खोलीत झालेल्या ‘सेटलमेंट’नंतरच हे उपोषण मागे घेण्यात आल्याचा खळबळजनक दावा बारस्कर यांनी एका पत्रकार परिषदेत केला.

‘सेटलमेंट’ आणि ‘ईडी’ कारवाईचा मुद्दा

बारस्कर म्हणाले की, २० दिवस चाललेले हे उपोषण नाट्य अखेर संपले आहे. अंतरवाली सराटीच्या सरपंचाचा मुलगा आणि एका कंत्राटदाराने मिळून महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याशी मध्यस्थी केली. वाळू माफिया आणि संभाव्य ‘ईडी’ चौकशी टाळण्यासाठीच ही तडजोड करण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला. या सेटलमेंटमुळे आता कोणतीही ईडी चौकशी होणार नाही, असा दावा करत जरांगे सर्वसामान्यांना आणि मराठा समाजाला भ्रमात ठेवत असल्याचे बारस्कर यांनी स्पष्ट केले.

“आरक्षणाचे नेतृत्व अयोग्य हातात”

मराठा आरक्षणाच्या संघर्षावर भाष्य करताना बारस्कर यांनी जरांगे यांच्या हेतूवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. “हे आंदोलन मराठा समाजाच्या हितासाठी नसून केवळ जरांगे यांच्या अहंकाराचा विजय आहे. आपल्या जवळच्या कार्यकर्त्यांना राजकारणात संधी मिळवून देण्यासाठीच ते या आंदोलनाचा वापर करत आहेत. जरांगे हे सध्या भाजपच्या तालावर चालत असून, त्यांना मोठे करण्यात भाजप सरकारचाच मोठा हात आहे,” असा थेट हल्लाबोल त्यांनी केला.

राजकीय स्क्रिप्ट आणि विखे पाटलांवर निशाणा

बारस्कर यांनी जरांगे यांच्या आंदोलनामागील राजकीय समीकरणांवरही निशाणा साधला. “जरांगे यांची पहिली स्क्रिप्ट बारामतीहून आली होती, तर दुसरी स्क्रिप्ट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तयार केली होती. आता मात्र ते शिंदेंवर टीका करून विखे पाटलांची बाजू घेत आहेत. या संपूर्ण घडामोडींमागे राधाकृष्ण विखे पाटील हेच मुख्य सूत्रधार असावेत,” असा संशयही त्यांनी व्यक्त केला.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

कॉपी करू नका.