मुंबई,दि.१३: मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून पेटलेल्या राजकारणात आता मराठा आरक्षण अभ्यासक अजय बारसकर (Ajay Baraskar) यांनी मनोज जरांगे पाटील यांच्यावर अत्यंत तिखट शब्दांत हल्लाबोल केला आहे. जरांगे पाटील यांचे आंदोलन म्हणजे निव्वळ एक बनाव असून त्यांच्या भंपकपणाला आता मराठा समाज विटला आहे, असा गंभीर आरोप बारसकर यांनी केला.
मुंबईवारीचा मार्ग बदलण्यामागे भीती?
मनोज जरांगे यांनी मुंबईला जाण्यासाठी यंदा वेगळा मार्ग निवडल्याचा मुद्दा उपस्थित करत बारसकर म्हणाले की, “आधीच्या मार्गावर आता लोक एकत्र येणार नाहीत याची पूर्ण कल्पना जरांगे यांना आली आहे. सलग तीन वेळा मुंबईकडे कूच करूनही समाजाच्या हाती काय पडले? दीड-दीड तास पत्रकार परिषदा घेऊन गप्पा मारणाऱ्या जरांगे यांना मुंबईला नेमके कशासाठी जायचे आहे, हे सांगता येत नाही.”
“अक्कलशून्य कारभारामुळे समाजाची हानी”
जरांगे पाटील यांच्यावर वैयक्तिक टीका करताना बारसकर म्हणाले की, “मराठा समाजाला आधीच आरक्षण उपलब्ध आहे. ज्यांच्याकडे पुरावे आहेत त्यांना ओबीसी दाखले मिळतात, तर इतरांना एसईबीसी (SEBC) अंतर्गत आरक्षण मिळते. असे असतानाही कोणताही कायदेशीर अभ्यास नसलेला हा अक्कलशून्य माणूस समाजाला चुकीच्या दिशेने घेऊन जात आहे. यामुळे मराठा समाजाचे अपरिमित नुकसान झाले आहे.”
आर्थिक व्यवहार अन् गाड्यांवरून प्रश्नचिन्ह
जरांगे यांच्या आंदोलनामागील आर्थिक स्त्रोतांवर संशय व्यक्त करत त्यांनी विचारले की, “डिफेंडरसारख्या आलिशान गाड्यांमध्ये फिरण्यासाठी पैसे कुठून येतात? मुंबईतील लीलावती रुग्णालयातील उपचारांचा खर्च कोणी केला? सत्ताधारी आणि विरोधक दोघेही आपल्या सोयीनुसार जरांगे पाटील यांचा वापर करत असून, ही केवळ ‘सुपारी बाज’ राजकारणाची एक खेळी आहे.”
शेवटी आव्हान देताना बारसकर म्हणाले की, जरांगे यांनी समाजासाठी नक्की काय हवे आहे हे एकदा कागदावर लिहून द्यावे, मी स्वतः त्यात मध्यस्थी करायला तयार आहे.








