Home महाराष्ट्र ‘वर्षा’वर बंद दाराआड काय घडलं? राज ठाकरे-देवेंद्र फडणवीस भेटीने राजकीय वातावरण तापलं!

‘वर्षा’वर बंद दाराआड काय घडलं? राज ठाकरे-देवेंद्र फडणवीस भेटीने राजकीय वातावरण तापलं!

0

मुंबई,दि.१२: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज सकाळी ८ वाजता ‘वर्षा’ या शासकीय निवासस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. या अचानक झालेल्या भेटीत कोकणातील प्रलंबित रस्ते आणि दादर येथील शिवाजी पार्क मैदानाशी संबंधित महत्त्वाच्या विषयांवर दोन्ही नेत्यांमध्ये विस्तृत चर्चा झाल्याचे समजते.

मुंबई-गोवा महामार्गावरून मनसेची आक्रमक भूमिका

गेल्या १७ वर्षांपासून रखडलेल्या मुंबई-गोवा महामार्गाच्या दुरवस्थेमुळे कोकणवासीयांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. या महामार्गावरील माणगाव बायपासचे काम संथ गतीने सुरू असल्याच्या पार्श्वभूमीवर, राज ठाकरे यांनी ९ ऑगस्ट रोजी स्वतः तेथे जाऊन रस्त्याची पाहणी केली होती. या पाहणीनंतर त्यांनी पत्रकारांशी बोलताना स्थानिक राजकीय हस्तक्षेप आणि भ्रष्टाचारावर कडाडून टीका केली होती.

विकासकामांपेक्षा केवळ ‘टक्केवारी’ लाटण्याकडेच राजकीय नेत्यांचे लक्ष असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला होता. “गेल्या १५ वर्षांपासून तेच खड्डे आणि तीच वाहतूक कोंडी जनता सहन करत आहे. प्रत्येक निवडणुकीत रस्ते, पाणी आणि रोजगाराचे तेच तेच विषय मांडले जातात. जर लोकप्रतिनिधींनी पक्षाचे मतभेद बाजूला ठेवून एकत्र प्रयत्न केले असते, तर या महामार्गाची ही अवस्था झाली नसती,” असा संतापही त्यांनी व्यक्त केला होता.

कोकणातील स्थानिक भूमिपुत्रांच्या जमिनी आणि संसाधनांचा गैरवापर होत असल्याचे सांगत, अशा प्रकारच्या विकासावरही त्यांनी सवाल उपस्थित केले होते. याच आक्रमक भूमिकेनंतर राज ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन महामार्गाचा प्रश्न मार्गी लावण्याची मागणी केली आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

कॉपी करू नका.