नवी दिल्ली,दि.१०: संसदेच्या पावसाळी अधिवेशनाचा अंतिम टप्पा राजकीय घडामोडींनी चांगलाच तापण्याची शक्यता आहे. सत्ताधारी पक्षाकडून या आठवड्यात महत्त्वाची विधेयके मंजूर करून घेण्यावर भर दिला जात असून, बहुचर्चित ‘डिलिमिटेशन’ (सीमांकन) विधेयक संसदेत नव्याने मांडले जाण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. या राजकीय वातावरणातच राष्ट्रवादी काँग्रेसच्या (शरदचंद्र पवार गट) ८ खासदारांची आज सोमवारी सकाळी ११ च्या सुमारास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी भेट होणार आहे.
खासदार सुप्रिया सुळे यांनी पत्रकार परिषदेत या भेटीबाबत माहिती दिली. या घडामोडीवर बोलताना आमदार रोहित पवार यांनी स्पष्ट केले की, खासदारांच्या मतदारसंघातील प्रलंबित विकासकामे आणि लोकप्रश्नांवर चर्चा करण्यासाठीच ही बैठक आहे. तसेच, संसदेत डिलिमिटेशन विधेयक आल्यास पवार गटाचे सर्व खासदार त्याच्या विरोधातच मतदान करतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
पंतप्रधानांना भेटणाऱ्या खासदारांची नावे:
सुप्रिया सुळे (बारामती)
डॉ. अमोल कोल्हे (शिरूर)
अमर काळे (वर्धा)
निलेश लंके (अहमदनगर)
सुरेश ऊर्फ बाळ्यामामा म्हात्रे (भिवंडी)
धैर्यशील मोहिते पाटील (माढा)
भास्कर भगरे (दिंडोरी)
बजरंग सोनावणे (बीड)
संसदेत दोन महत्त्वाची विधेयके मांडली जाण्याची शक्यता
अधिवेशनाच्या शेवटीही संसदेत गदारोळ कायम राहण्याची चिन्हे आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांच्या सभागृहातील उपस्थितीवरून विरोधकांनी सरकारला घेरल्याने कामकाज वारंवार बाधित होत आहे.
दरम्यान, या शेवटच्या आठवड्यात लोकसभेत दोन महत्त्वपूर्ण विधेयके सादर केली जाऊ शकतात. यामध्ये ‘केरळ’ राज्याचे नाव बदलून ‘केरळम’ करण्यासंबंधीचे विधेयक आणि ‘राष्ट्रीय सहकार विकास महामंडळ कायद्यात सुधारणा’ करणारे विधेयक यांचा समावेश आहे. त्यामुळे या विधेयकांवर आणि पवार गटाच्या खासदारांच्या भेटीवर संपूर्ण देशाचे लक्ष लागून राहिले आहे.








