सोलापूर,दि.८: सोलापूर येथील जुळे सोलापूर भागातील गणेश बिल्डर्स स्कीम नं. ३ मधील नागरिकांना भीषण त्रासाला सामोरे जावे लागत आहे. येथील वसाहतीतील नागरिकांच्या ये-जा करण्याचा रस्ता शेजारील जागेच्या मालकाने आज (दि. ८) पूर्णपणे उखडून टाकला.
सकाळी रस्ता उखडण्याचे काम सुरू असल्याचे लक्षात येताच सोसायटीच्या अध्यक्षा ॲड. नीता जोशी यांनी तातडीने पोलिसांशी संपर्क साधून घटनेची माहिती दिली. मात्र, पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून रस्ता उखडण्याचे काम थांबवण्याऐवजी, “जागेची कागदपत्रे घेऊन पोलीस ठाण्यात या,” असे सांगत तेथून काढता पाय घेतला. ॲड. जोशी यांनी महापौर विनायक कोंड्याल यांनाही संपर्क केला. महापौरांनी अधिकारी पाठवतो असे सांगितले.
पोलीस निघून गेल्यानंतर संपूर्ण रस्ता पूर्णपणे उखडण्यात आला. या प्रकारामुळे त्रासलेल्या नागरिकांनी सकाळपासून सोलापूर महानगरपालिकेच्या आयुक्तांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेण्याचा प्रयत्न केला, परंतु भेट होऊ शकली नाही. आयुक्त सुट्टीवर असल्याचे नागरिकांना सांगण्यात आले. त्यावर, “किमान संबंधित अधिकाऱ्यांना तरी घटनास्थळी पाठवा,” अशी विनंती ॲड. जोशी यांनी केली; परंतु आज अधिकारीही सुट्टीवर असल्याचे उत्तर त्यांना मिळाले.
दुपारी ३ वाजेपर्यंत रस्ता उखडण्याचे काम सर्रास सुरू होते. या कारवाईदरम्यान पिण्याच्या पाण्याची पाइपलाइनही तोडण्यात आली. स्थानिक नागरिकांनी तेथे पिण्याच्या पाण्याची लाइन असल्याचे वारंवार सांगूनही, ती मुद्दाम उद्ध्वस्त करण्यात आल्याचे समोर आलेल्या व्हिडिओंवरून स्पष्ट होत आहे. नागरिकांनी पोलिस आयुक्त यांना भेटण्याचा प्रयत्न केला मात्र तेही सुट्टीवर असल्याने भेट झाली नाही.








