Home देश तर पुन्हा आंदोलनाचा ‘सीजेपी’चा केंद्र सरकारला इशारा

तर पुन्हा आंदोलनाचा ‘सीजेपी’चा केंद्र सरकारला इशारा

0
सौरभ दास

नवी दिल्ली,दि.२८: केंद्र सरकारने दिलेल्या आश्वासनांची पूर्तता वेळेत केली नाही, तर देशव्यापी आंदोलन पुन्हा छेडण्यात येईल, असा थेट इशारा कॉक्रोच जनता पार्टीने (सीजेपी) सोमवारी दिला आहे. जंतर-मंतर येथील आंदोलनातील स्थानिकांना व विद्यार्थ्यांना तातडीने मुक्त करावे आणि दाखल केलेले गुन्हे मागे घेण्याबाबत मंगळवारपर्यंत स्पष्ट लेखी हमी द्यावी, अशी मागणी पक्षाने केली आहे.

पक्षाच्या पत्रकार परिषदेत उपस्थित असलेले ज्येष्ठ कायदेतज्ज्ञ व राज्यसभा खासदार कपिल सिब्बल यांनी सीजेपीला कायदेशीर सहकार्य करत असल्याचे स्पष्ट केले. या वेळी केंद्र सरकारच्या धोरणावर टीका करताना सिब्बल म्हणाले, “सध्याचे सरकार आधी अडचण नाकारते आणि नंतर आंदोलकांनाच अराजकतावादी ठरवून त्यांच्यावर लाठीहल्ला करते. शेवटी दबाव वाढला की नावापुरती एखादी समिती स्थापन करून मोकळे होते.”

प्रवक्त्यांनी उपस्थित केलेले महत्त्वाचे मुद्दे:

सौरव दास (प्रवक्ता, सीजेपी): बिहार, आसाम आणि पश्चिम बंगालमध्ये शेकडो विद्यार्थ्यांवर खोटे गुन्हे दाखल करून त्यांना अटक करण्यात आली आहे. सरकारने दिलेला शब्द पाळलेला नाही.

आशुतोष रांका (प्रवक्ता, सीजेपी): जंतर-मंतरवरील ३६ दिवसांचे आंदोलन मागे घेताना झालेल्या चर्चेत, देशभरातील आंदोलकांवरील ‘एफआयआर’ रद्द करण्याचे आणि नव्याने कारवाई न करण्याचे आश्वासन केंद्राने दिले होते. मात्र, त्याची अंमलबजावणी झालेली नाही.

विद्यार्थ्यांच्या मदतीसाठी ‘साक्षी’ डिजिटल व्यासपीठ

आंदोलनादरम्यान होणारा पोलिसांचा गैरवापर आणि पुराव्यांशी होणारी छेडछाड रोखण्यासाठी सीजेपीने ‘साक्षी’ नावाचे ॲप आणि संकेतस्थळ सुरू केले आहे. या डिजिटल मंचावरून पीडित विद्यार्थी स्वतःकडील मूळ फोटो, व्हिडिओ आणि माहिती अपलोड करू शकतील, ज्याचा वापर न्यायालयात भक्कम पुरावा म्हणून केला जाईल.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

कॉपी करू नका.