मुंबई,दि.२४: मुंबईतील दादर येथे झालेल्या आंदोलनानंतर एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने मोठा वाद निर्माण झाला आहे. या व्हिडिओमध्ये एका विद्यार्थिनीशी गैरवर्तन झाल्याचा आरोप करण्यात येत असून, त्यावरून राजकीय आणि सामाजिक पातळीवर प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत.
घटनेत सिव्हिल ड्रेसमध्ये असलेल्या एका पोलीस कर्मचाऱ्याने विद्यार्थिनीला अयोग्य पद्धतीने हाताळल्याचा दावा करण्यात आला आहे. व्हिडिओमध्ये दिसणाऱ्या गोंधळात धक्काबुक्की झाल्याचेही दिसत असून, या प्रकारामुळे नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.
या पार्श्वभूमीवर अनेक नेत्यांनी प्रशासनावर प्रश्न उपस्थित केले आहेत. वर्षा गायकवाड, रोहित पवार आणि जितेंद्र आव्हाड यांनी या घटनेचा निषेध करत, संबंधित व्यक्तीवर तात्काळ कारवाईची मागणी केली आहे.
दरम्यान, या प्रकरणातील पोलीस कर्मचारी शिवाजी पार्क पोलीस ठाण्याशी संबंधित असून दीपक बल्लाळ असे त्यांचे नाव असल्याचे समोर आले आहे. मात्र, या सर्व आरोपांना पोलीस विभागाने स्पष्टपणे नाकारले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आंदोलनानंतर एक तरुण पुन्हा लोकांना भडकवण्याचा प्रयत्न करत होता. त्याला ताब्यात घेण्यासाठी गेलेल्या अधिकाऱ्यांना अडथळा निर्माण करत एक तरुणी मध्ये आली. त्याच गोंधळात हा प्रकार घडल्याचे सांगितले जात आहे. संबंधित व्हिडिओचा चुकीचा अर्थ लावला जात असल्याचा दावा पोलिसांनी केला आहे.
मुंबई पोलिसांनी अधिकृत निवेदनाद्वारे सांगितले की, संबंधित अधिकारी प्रत्यक्षात पुरुष आंदोलकाला पकडण्याच्या प्रक्रियेत होते आणि त्यावेळी घडलेली घटना संदर्भाबाहेर दाखवली जात आहे. कोणताही निष्कर्ष काढण्यापूर्वी वस्तुस्थिती तपासणे आवश्यक असल्याचेही त्यांनी नमूद केले आहे.
या घटनेची वरिष्ठ स्तरावर चौकशी करण्यात आली असून, व्हिडिओचे बारकाईने परीक्षण सुरू आहे. सत्यस्थिती स्पष्ट होईपर्यंत कोणताही घाईचा निष्कर्ष काढू नये, असेही पोलिसांनी आवाहन केले आहे.
दरम्यान, या घटनेमुळे आंदोलन हाताळताना पोलीसांच्या कार्यपद्धतीवर पुन्हा एकदा चर्चा रंगली असून, पुढील कारवाई काय होते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.








