Home चित्रपट ३ रा नाफा चित्रपट महोत्सव: महाराष्ट्र शासनाच्या सहकार्याने सॅन होजे येथे रंगणार...

३ रा नाफा चित्रपट महोत्सव: महाराष्ट्र शासनाच्या सहकार्याने सॅन होजे येथे रंगणार मराठी सिनेमाचा सोहळा

0

  • ५ मराठी चित्रपटांचे वर्ल्ड प्रीमिअर आणि ११ पुरस्कारप्राप्त लघुपटांचे स्क्रीनिंग
  • जागतिक व्यासपीठावर मराठी सिनेमाची नवी भरारी!

सोलापूर: मराठी चित्रपटसृष्टीला जागतिक स्तरावर व्यापक ओळख मिळवून देणारा ३ रा नाफा (NAFA) चित्रपट महोत्सव येत्या ७ ते ९ ऑगस्ट २०२६ दरम्यान सॅन होजे (अमेरिका) येथील ऐतिहासिक ‘कॅलिफोर्निया थिएटर’मध्ये आयोजित केला आहे. ‘नॉर्थ अमेरिकन फिल्म असोसिएशन’ (नाफा) आणि ‘महाराष्ट्र शासन’ यांच्या संयुक्त विद्यमाने हा सोहळा पार पडेल.

या महोत्सवात दर्जेदार तांत्रिक व आशयघन कलाकृतींचा उत्कृष्ट संगम पाहायला मिळणार आहे. दोन दिवसांच्या कालावधीत ५ मराठी चित्रपटांचे ‘वर्ल्ड प्रीमिअर’ आणि ११ निवडक पुरस्कारप्राप्त लघुपटांचे ‘विशेष स्क्रीनिंग’ होणार आहे. जगभरातील मराठी रसिकांसाठी ही एक खास पर्वणी ठरेल, अशी माहिती नाफाचे संस्थापक-अध्यक्ष अभिजित घोलप यांनी दिली.

‘या’ ५ चित्रपटांचे होणार वर्ल्ड प्रीमिअर

यंदाच्या महोत्सवात जागतिक स्तरावर प्रथम प्रदर्शित होणाऱ्या चित्रपटांमध्ये खालील ५ चित्रपटांचा समावेश आहे:

  1. तु मी आणि अमायरा
  2. न आवडती गोष्ट
  3. द्विधा
  4. पारो
  5. फ्रेम

प्रेम, कुटुंब, सामाजिक वास्तव, स्त्री-अस्तित्व आणि मानवी भावविश्व अशा विविध विषयांवर भाष्य करणाऱ्या या कलाकृतींमधून मराठी चित्रपटसृष्टीतील सर्जनशीलता आणि आशयवैविध्य दिसून येईल.

अभिजीत घोलप

११ पुरस्कारप्राप्त लघुपटांची निवड

महोत्सवासाठी ‘ब्रह्मकमळ’, ‘बटरस्कॉच’, ‘एक सुवर्ण प्रवास’, ‘हायफन’, ‘अनडॉक्युमेंटेड’, ‘पान्हा’, ‘एच-१ बी ऑर नॉट टू बी’, ‘बबनराव इन लव्ह विथ एला’ आणि ‘केकी’ यांसह एकूण ११ लघुपटांची निवड झाली आहे.

विशेष म्हणजे, नाफा निर्मित ‘अनडॉक्युमेंट डॉट पीडीएफ’ (Undocumented.pdf) या लघुपटाचेही येथे ‘वर्ल्ड प्रीमिअर’ होणार आहे. अमेरिकेतील सध्याच्या संवेदनशील ‘इमिग्रेशन’ विषयावर आधारित या लघुपटात समकालीन सामाजिक वास्तव अत्यंत प्रभावीपणे मांडले आहे.

महाराष्ट्र शासनाचे सहकार्य व निवड प्रक्रिया

नाफाचे संस्थापक-अध्यक्ष अभिजित घोलप म्हणाले:

“नाफासाठी हे वर्ष अत्यंत विशेष आणि ऐतिहासिक आहे. महाराष्ट्र शासनाचे सहकार्य ही केवळ प्रशासकीय भागीदारी नसून मराठी चित्रपटसृष्टीच्या जागतिक प्रवासाला नवी ऊर्जा देणारी प्रेरणा आहे. यामुळे मराठी चित्रपटाला जागतिक स्तरावर भक्कम व्यासपीठ मिळाले आहे.

यंदा भारत, अमेरिका आणि इतर देशांतून विक्रमी संख्येने प्रवेशिका प्राप्त झाल्या होत्या. त्यामुळे निवड प्रक्रिया आव्हानात्मक होती. केवळ मनोरंजन नव्हे, तर विषयाची परिणामकारकता आणि तांत्रिक दर्जा या निकषांवर चित्रपटांचे मूल्यमापन करण्यात आले.”

मूल्यमापनाचे ६ प्रमुख निकष:

  • दिग्दर्शन
  • पटकथा
  • संकलन (Editing)
  • अभिनय
  • छायांकन (Cinematography)
  • एकूण परिणामकारकता

परीक्षण प्रक्रियेत स्वप्ना वाघमारे-जोशी, आदित्य पटवर्धन, अनिकेत ढवळे, नितीन अडसूळ, डॉ. गौरी घोलप, भालचंद्र कुलकर्णी आणि दिलीप राणे या मान्यवरांनी परीक्षक म्हणून काम पाहिले.

जागतिक सांस्कृतिक सेतू

महाराष्ट्र शासनाची अधिकृत मान्यता मिळालेला सॅन होजे येथील हा ३ दिवशीय महोत्सव केवळ चित्रपट प्रदर्शनापुरता मर्यादित नाही. नवोदित व प्रस्थापित निर्माते, दिग्दर्शक, कलाकार, तंत्रज्ञ आणि प्रेक्षक यांना एकाच व्यासपीठावर आणून जागतिक सांस्कृतिक सेतू बांधण्याचे काम नाफा करत आहे. मराठी सिनेमाची वाढती गुणवत्ता आणि आंतरराष्ट्रीय ओळख अधिक दृढ करणारा हा महोत्सव एक ऐतिहासिक टप्पा ठरेल.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

कॉपी करू नका.