सोलापूर,दि.२३: देशातील विविध स्पर्धा परीक्षांमधील पेपर लीकच्या घटनांमुळे निर्माण झालेल्या वातावरणावर अखेर केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. पेपर लीक प्रकरणांवर भाष्य करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक मोठी घोषणा केली असून, यातील दोषींना तात्काळ व कठोर शिक्षा सुनावण्यासाठी सरकार आता विशेष पाऊल उचलणार आहे.
युवा पिढीच्या भविष्यासाठी महत्त्वाचा निर्णय
पंतप्रधान मोदी यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘X’ वर माहिती देताना सांगितले की, “आपल्या युवा पिढीचे कल्याण आणि त्यांचे भविष्य यापेक्षा अधिक महत्त्वाचे काहीही नाही. पेपर लीक प्रकरणातील दोषींना लवकरात लवकर आणि कठोर शिक्षा मिळावी यासाठी फास्ट ट्रॅक कोर्ट (Fast-Track Courts) स्थापन करण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे.”
यासोबतच, तरुणांच्या स्वप्नांशी आणि भविष्याशी खेळणाऱ्या कोणालाही सोडले जाणार नाही, असा कडक इशाराही पंतप्रधानांनी दिला आहे.
आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर मोठा निर्णय
गेल्या काही दिवसांत NEET-UG आणि इतर महत्त्वाच्या परीक्षांच्या पेपर लीकच्या बातम्यांमुळे देशभरातील विद्यार्थ्यांमध्ये तीव्र असंतोष पाहायला मिळाला होता. विविध ठिकाणी विद्यार्थ्यांनी आंदोलनेही केली होती. या पार्श्वभूमीवर पंतप्रधानांच्या या घोषणेने विद्यार्थ्यांना आणि पालकांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे.








