Home देश मोठी बातमी! विद्यार्थ्यांसाठी ठाकरे बंधू एकत्र; ‘या’ तारखेला मुंबईत मोर्चा

मोठी बातमी! विद्यार्थ्यांसाठी ठाकरे बंधू एकत्र; ‘या’ तारखेला मुंबईत मोर्चा

0

मुंबई,दि.२२: राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठी घडामोड घडताना दिसत आहे. विद्यार्थ्यांच्या भवितव्याच्या प्रश्नावरून उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे दोघे भाऊ एकत्र येत रस्त्यावर उतरणार आहेत. येत्या 26 तारखेला मुंबईत संयुक्त मोर्चा काढण्याचा निर्णय घेण्यात आला असून, या मोर्चाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

या मोर्च्याबाबत सविस्तर माहिती देण्यासाठी राज ठाकरे उद्या सकाळी पत्रकार परिषद घेणार आहेत. त्यामुळे या आंदोलनाची दिशा आणि रणनीती काय असणार, याबाबत उत्सुकता वाढली आहे. यापूर्वी मराठी अस्मितेच्या मुद्द्यावर ठाकरे बंधू एकत्र आले होते, आणि आता विद्यार्थ्यांच्या प्रश्नावर त्यांनी पुन्हा एकत्र येण्याचा निर्णय घेतल्याने या घडामोडींना विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.

दरम्यान, दिल्लीतील जंतर-मंतर येथे अभिजीत दिपके यांचे आंदोलन सुरू असून, या आंदोलनाला ठाकरे बंधूंनी पाठिंबा दर्शवला आहे. केंद्र सरकारच्या भूमिकेविरोधात नाराजी व्यक्त करत, शिक्षणमंत्र्यांचा राजीनामा न घेणे, तसेच पंतप्रधान आणि गृहमंत्र्यांची शांत भूमिका, यावर त्यांनी अप्रत्यक्षपणे टीका केली आहे. आंदोलकांवर झालेल्या कारवाईचाही त्यांनी निषेध नोंदवला आहे.

या पार्श्वभूमीवर ठाकरे बंधूंनी थेट रस्त्यावर उतरून आवाज उठवण्याचा निर्णय घेतला आहे. या मोर्चात ते नेमकं काय भूमिका मांडणार, याकडे राजकीय वर्तुळासह सर्वसामान्यांचेही लक्ष लागले आहे.

याचदरम्यान, मनसे नेते अमित ठाकरे आणि शिवसेना (ठाकरे गट) नेते आदित्य ठाकरे यांनी मुंबईतील शिवतीर्थ येथे सुरू असलेल्या विद्यार्थी आंदोलनाला भेट दिली. विद्यार्थ्यांशी संवाद साधताना आदित्य ठाकरे यांनी युवकांच्या एकजुटीचं कौतुक केलं.

“तुम्ही मोठ्या संख्येने एकत्र आलात, हीच खरी ताकद आहे. येथे कुठलाही राजकीय अजेंडा नाही, तर देशाच्या भविष्यासाठी आवाज उठवणारे तरुण आहेत,” असे ते म्हणाले. त्यांनी आंदोलकांना एकत्र राहण्याचे आवाहन करत देशभक्तीच्या घोषणांनी वातावरण दुमदुमवण्याचे आवाहनही केले.

तसेच, दिल्लीतील घटनांबाबत बोलताना त्यांनी स्पष्ट केलं की, “मुंबई पोलिसांनी संयम राखला आहे, त्यांनी कुणावरही हात उचललेला नाही. यासाठी त्यांचे आभार मानले पाहिजेत.”

एकूणच, विद्यार्थ्यांच्या प्रश्नावरून ठाकरे बंधूंचा हा संयुक्त मोर्चा राज्यातील राजकारणाला नवी दिशा देणार का, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

कॉपी करू नका.